मुंबई- राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची धक्कादायक घटना घडल्यानंतर आज मविआने एकजूट दाखवित रस्त्यावर उतरून मोर्चा काढत जोरदार शक्तिप्रदर्शन केले! यावेळी उद्धव ठाकरे विशेष भगव्या रंगाचा कुर्ता घालून आले होते. शरद पवारही आज प्रचंड उत्साह दाखवित शाहू महाराज छत्रपती यांचा हात हातात घेऊन मोर्चात चालले! आजारपणामुळे गेली काही दशके ते मोर्चात चालले नाहीत. पण आज महायुती आणि मोदी सरकार पाडायचेच ही इर्षा दाखवत त्यांनी दमदार पावले टाकली.
महाविकास आघाडीमधील शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि काँग्रेस पक्ष मालवण राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ आज रस्त्यावर उतरले. या आंदोलनात अनेक शिवप्रेमी आणि आघाडीतील कार्यकर्ते सहभागी झाले होते. आधी हुतात्मा चौक ते गेट-वे ऑफ इंडिया असा मोर्चा काढण्यात आला. राज्याच्या निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना अभिवादन म्हणून हुतात्मा चौक येथून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली. राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे महाराष्ट्र अध्यक्ष नाना पटोले यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. मोर्चात छत्रपती शाहू महाराज, संजय राऊत, सुप्रिया सुळे,
आदित्य ठाकरे, वर्षा गायकवाड, अरविंद सावंत, भाई जगताप, चंद्रकांत हंडोरे, अस्लम शेख, वैभव नाईक हे आघाडीतील नेते सहभागी झाले होते.
मविआच्या या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. मोर्चा अडवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयासमोर बॅरिकेड लावण्यात आले होते. मात्र मोर्चात हजारो कार्यकर्ते आणि शिवप्रेमी सामील झाल्याचे पाहून नंतर हे बॅरिकेड काढण्यात आले. मोर्चाला गेट-वे ऑफ इंडिया पर्यंत जाण्यास परवानगी देण्यात आली. सरकार विरोधात घोषणाबाजी करत मोर्चा गेट-वे ऑफ इंडियाच्या दिशेने निघाला. फुशारकी नको 56 इंचच्या छातीची, उतरा मैदानात तुम्हाला आण आहे महाराष्ट्राच्या मातीची, मिंधे सरकार आणि भाजपाला आम्ही जाब विचारायला आलोय, मिंधे आणि कमजोर सरकारचा निषेध असे फलक आंदोलनकर्त्यांच्या हाती होते.
ज्येष्ठ नेते शरद पवार, शाहू महाराज, उद्धव ठाकरे, नाना पटोले हे नेते मोर्चाच्या पुढे चालत होते. मात्र, काही अंतर चालल्यावर प्रकृती ठीक नसल्याने शरद पवार आणि शाहू महाराज यांना गाडीत बसवण्यात आले. श्यामाप्रसाद मुखर्जी चौकातील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चा गेट-वे ऑफ इंडिया येथे पोहोचला. तिथे शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करून सरकारला जोडे मारा आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन केल्यास वाद होण्याची शक्यता गृहित धरून पोलिसांनी गेटवे ऑफ इंडिया परिसरात जाण्यापूर्वीच कार्यकर्त्यांकडून बॅनर काढून घेतले होते. मात्र, नेत्यांकडे एक बॅनर होता. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची छायाचित्रे होती. या बॅनरला मविआ नेत्यांनी जोडे मारले. मोर्चामुळे आज गेटवे ऑफ इंडिया परिसर पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला होता.
मोर्चामध्ये सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आमच्यावर राजकारण केले जाते असा आरोप केला जातो. मात्र आम्ही त्याला राजकारण म्हणायला तयार नाही. शिवद्रोही सरकारच्या विरोधात शिवप्रेमी रस्त्यावर उतरले आहेत. सत्ताधाऱ्यांकडून राजकरणकेले जात आहे. महाराजांचा पुतळा कोसळला हा त्यांचा अवमान आहे, या चुकीला माफी नाही. पंतप्रधान मोदींनी माफी मागितली. घाईगडबडीत राम मंदिर उभारले त्याला गळती लागली. संसद उभारली त्यालाही गळती लागली. दिल्ली विमानतळाचे छत कोसळले, बिहारमधील पूल कोसळले, आता छत्रपतींचा पुतळा कोसळला. मोदी कशाकशाची माफी मागणार आहेत? मोदींनी माफी मागितली तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर मग्रुरी होती. आता बस झाले, असे राष्ट्रपती म्हणाल्या. खरेच बस झाले, म्हणायची वेळ आली आहे. हा शिवप्रेमींचा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र धर्माचा अवमान सहन केला जाणार नाही. शिवप्रेमींच्या मनातील संताप व्यक्त करण्यासाठी देशाचे प्रवेशद्वार असलेल्या गेटवे ऑफ इंडिया येथे आज आंदोलन केले जात आहे. हे भारताचे प्रवेशद्वार आहे. येथूनइंग्रज भारतात आले होते. याच ठिकाणाहून शिवद्रोही सरकार चले जाओ अशी बोलण्याची वेळ आली आहे.
शरद पवार आपल्या भाषणात म्हणाले की, राज्यात शिवरायांचे अनेक पुतळे आहेत. ते कधीही कोसळले नाहीत. राजकोट येथील पुतळा भ्रष्टाचाराचा नमुना होता. पुतळा उभारण्याच्या कामात भ्रष्टाचार झाला. शिवरायांचा पुतळा कोसळला हा शिवप्रेमींचा अपमान आहे. छत्रपती शाहू महाराज म्हणाले की, या घटनेत जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. शिवरायांचा मान आपण सर्वांनी राखायला हवा.
काँग्रेसचे महाराष्ट्र अध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, राज्यात शिवाजी महाराजांचे नाव घेऊन शिवद्रोही सरकार सत्तेत आले आहे. छत्रपतींचा पुतळा कोसळला. राज्य आणि केंद्र सरकारने त्यांचा अवमान केला. राज्यात चुकून शिवद्रोही सरकार सत्तेवर आणले म्हणून पंतप्रधान मोदींनी माफी मागितली असावी. मात्र आम्ही असे शिवद्रोही सरकार पुन्हा सत्तेवर येऊ देणार नाही, अशी आज शपथ घेतली आहे. पंतप्रधान, मुख्यमंत्री हे माफीवीर निवडणुकातोंडावर असल्याने माफी मागत आहेत. मात्र आम्ही सरकारला चले जावचा नारा देण्यासाठी एकत्र आले आहोत.
महाविकास आघाडीच्या आजच्या आंदोलनावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, लाडकी बहीण योजनेत हे खोडा घालत आहेत, त्यांना लाडक्या बहिणी जोडे मारतील. जनतेने त्यांना दोन वर्षांपूर्वीच पदावरून काढून टाकले आहे. त्यांना त्यांची जागा दाखवली आहे. शिवरायांचे नाव घेऊन औरंगी आणि अफझलखानी काम सुरू होते. आघाडीच्या काळात महिला सुरक्षित नव्हत्या, नवनीत राणा यांना तरुंगात टाकण्यात आले. कंगना रनौत यांचे घर पाडण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज हा संवेदनशील, भावनिक आणि अस्मितेचा विषय आहे. त्याचे राजकारण करू नये.
काँग्रेसचे केंद्रिय नेते पवन खेरा मुंबईत पत्रकार परिषदेत म्हणाले की, मोदींनी माफी मागितली परंतु त्यात नम्रपणा नव्हता. असा नेता या देशात नको. त्यांनी ज्या पद्धतीने माफी मागितली त्याबद्दल त्यांनी पुन्हा माफी मागितली पाहिजे. ते महाराजांच्या आदर्शाबद्दल बोलतात. पण आज वाराणसीत बलात्कारीला जामीन मिळाला, त्याला केक खायला घातला, कठुआत तेच झाले, बिल्कीस बानोच्या दोषींचा सत्कार केला.
भाजपाचे चार सवाल
डिस्कव्हरी ऑफ इंडिया या पुस्तकात जवाहरलाल नेहरू यांनी छत्रपतींना दरोडेखोर म्हटले, याचे उत्तर द्या.
मध्यप्रदेशात कमलनाथ मुख्यमंत्री असताना छिंदवाड्यात जेसीबी लावून छत्रपतींचा पुतळा पाडण्यात आला, याचे उत्तर द्या.
संजय राऊत यांनी शिवाजी महाराजांच्या वंशजांकडे वंशज असल्याचे पुरावे मागितले, याचे उत्तर द्या.
जितेंद्र आव्हाड म्हणाले की अफजलखान, शाहिस्तेखान नसते तर शिवाजी महाराज नसते, याचे उत्तर द्या.