शिवडीच्या रुग्णालयाला बालक्षयरोग तज्ज्ञच मिळेना

मुंबई – मुंबई महापालिकेच्या शिवडी येथील टीबी अर्थात क्षयरोग रुग्णालयात लहान मुलांसाठी २० खाटांचा विशेष वॉर्ड तयार करण्यात आला आहे. तरीही याठिकाणी काम करण्यास कोणताही बाल क्षयरोगतज्ज्ञ येत नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे.त्यासाठी आता पालिका पुन्हा एकदा जाहिरात देणार असून यासंदर्भातील जागरूकतेसाठी पालिका सज्ज झाली आहे,अशी माहिती या रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. नम्रता कौर यांनी दिली.

विशेष म्हणजे इतर रुग्णालयात बाल क्षयरोगतज्ज्ञ म्हणून काम करणारे तज्ज्ञ शिवडी रुग्णालयात काम करण्यास का धजावत नाहीत, असा प्रश्नही पालिकेला पडला आहे.गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यापासून शिवडी टीबी रुग्णालयात बाल क्षयरोग विभाग बांधण्याचे काम सुरू होते. हा वॉर्ड आता तयार झाला असून जागतिक क्षयरोगाच्या दिनानिमित्त त्याचे उद्‍घाटन करण्याची पालिकेची तयारी होती,पण लहान मुलांसाठी लागणारे बालरोगतज्ज्ञच अजूनपर्यंत पालिकेला उपलब्ध झाले नसल्याने येथे फक्त मोठ्या मुलांवर उपचार केले जात आहेत.सध्या रुग्णालयात १६ वर्षांवरील टीबी रुग्णांना दाखल करून उपचार केले जातात; मात्र १ ते १५ वर्षांपर्यंतच्या मुलांवर उपचार करण्यासाठी बालरोगतज्ज्ञांची गरज मोठ्या प्रमाणात भासते;मात्र बालरोगतज्ज्ञच उपलब्ध नसल्याने आजही रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात उपचारांसाठी पाठवले जाते.

वैद्यकीय अधीक्षक डॉ.नम्रता कौर म्हणाल्या की,क्षयरोगाने ग्रस्‍त असलेल्‍या लहान मुलांना हाताळण्याची एक वेगळी पद्धत असते. साधी सलाईन लावण्यासाठी सराव केलेले बालरोगतज्ज्ञच लागतात.शिवाय लहान मुलांना दिले जाणारे डोसही वेगळे असतात.लहान मुलांना चांगले उपचार मिळावेत यासाठी येथे विशेष वॉर्ड बांधला गेला. तसेच यासंदर्भातील जाहिराती अनेकदा प्रसिद्ध केल्या गेल्या आहेत; मात्र २०२० पासूनच या रुग्णालयात बालरोगतज्‍ज्ञ उपलब्ध झोलेला नाही.शिवडी टीबी रुग्णालयात सर्जरी विभाग लवकरच सुरू होणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या भूलतज्ज्ञांची नेमणूक झाली आहे.या पदासाठी आवश्यक असलेले नियम आणि मोठ्या पगाराची पूर्तता करण्यात आली आहे. आतापर्यंत दोन डॉक्टर काम करण्यास तयार झाले. मात्र पुन्हा त्यांनी वैयक्तिक कारण देत त्याकडे कानाडोळा केला.यातून ते कामाबाबत उत्सुक नसल्‍याचे दिसून आले.तरीही आमचे प्रयत्न सुरू आहेत.पुन्हा पालिका जाहिरात देणार आहे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top