बंगळुरु – कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी काँग्रेसमधून होत आहे. काल बेळगावी येथे शिवकुमार यांच्या समर्थकांनी शक्तिप्रदर्शन केल्यानंतर गुणधर महाराज या जैन मुनींनी शिवकुमार मुख्यमंत्री झाल्याचे आपल्याला स्वप्नात दिसल्याचे सांगून धमाल उडवून दिली. कर्नाटकमध्ये नेतृत्वबदलाची चर्चा मागील अनेक दिवस सुरू आहे. शिवकुमार यांनाच मुख्यमंत्री पद द्यावे,अशी राज्य काँग्रेसची मागणी आहे. मात्र दिल्लीतील काँग्रेसच्या श्रेष्ठींकडून अद्याप याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही.
या पार्श्वभूमीवर काल बेळगावी येथे प्रदेश काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गांधी भारत मेळाव्यात शिवकुमार यांच्या समर्थकांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. शिवकुमार यांच्या नावाने भावी मुख्यमंत्री असे नारे देत समर्थकांनी शिवकुमार यांना मुख्यमंत्री जाहीर करून टाकले. हे सर्व घडत असताना जैन मुनी गुणधर नंदी महाराज यांनी त्यात उडी घेतली. एका जाहीर कार्यक्रमात बोलताना शिवकुमार मुख्यमंत्री झाल्याचे आपण काल स्वप्नात पाहिले,असे गुणधर महाराजांनी सांगितले.