सातारा – साताऱ्याच्या संग्रहालयात मागील सात महिन्यांपासून असलेली छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक वाघनखे नागपूरला पाठवण्यात आली. ही वाघनखे नागपूर येथील मध्यवर्ती संग्रहालयात पुढील आठ महिने प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत. साताऱ्यातील संग्रहालयात या वाघनखांसाठी तयार करण्यात आलेल्या दालनात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बोटांचा ठसा तसेच साताऱ्याचे संस्थापक शाहू महाराज यांचा बिचवा अथवा शिवकालीन एकधारी वाघनख ठेवण्याही विचार पुरातत्त्व विभागाकडून सुरू आहे.
लंडन येथील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममध्ये असलेली ऐतिहासिक वाघनखे साताऱ्यातील संग्रहालयात १९ जुलै २०२४ रोजी भारतात आणण्यात आली. २० जुलैपासून ही वाघनखे तसेच शिवशस्त्र शौर्यगाथा हे शस्त्र प्रदर्शन साताऱ्याच्या संग्रहालयात नागरिकांना पाहण्यासाठी खुले करण्यात आले. गेल्या सहा महिन्यांत राज्यभरातील साडेचार लाखांहून अधिक नागरिकांनी या संग्रहालयाला भेट दिली. पुरातत्त्व विभाग व राज्य शासनाने तयार केलेल्या वेळापत्रकानुसार या ऐतिहासिक वाघनखांचा साताऱ्यातील मुक्काम ३१ जानेवारीला पूर्ण झाला. आता १ फेब्रुवारी ते २ ऑक्टोबरपर्यंत ती नागपूर येथे तर त्यानंतर ३ ऑक्टोबर ते ३ मे २०२६ पर्यंत कोल्हापूर येथील संग्रहालयात ठेवण्यात येणार आहेत.