शिर्डी- शिर्डीत साईबाबांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त साई दर्शनासाठी भाविकांनी काल रात्रीपासूनच गर्दी केली होती. भाविकांची गर्दी लक्षात घेऊन यावर्षीही साई मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुले ठेवण्यात आले होते. १५ ऑक्टोबर १९१८ रोजी दसऱ्याच्या दिवशी साईबाबांनी समाधी घेतली. त्यामुळे बाबांचे स्मरण करत लाखो भाविक या दिवशी साईसमाधीवर नतमस्तक होतात. सलग तीन दिवस हा उत्सव साईबाबा संस्थानच्या वतीने साजरा करण्यात येतो. यंदा मुंबईतील व्दारकामाई मित्र मंडळाने स्वखर्चाने साईबाबा मंदिराच्या ४ नंबर प्रवेशद्वाराच्या आत साई बालाजी देखावा उभारला होता. हा देखावा भाविकांचे लक्ष वेधून घेत होता. तसेच साई मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाईही करण्यात आली होती. आज उत्सवाचा मुख्य दिवस असल्याने शिर्डीत भाविकांची मोठी मांदियाळी होती.