पुणे
पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील टेंभेकर वस्ती येथे काल रात्री ७ वाजताच्या सुमारास घराच्या अंगणात खेळत असलेल्या एका मुलावर बिबट्याने हल्ला करून त्याला ठार केले. शिवतेज समाधान टेंभेकर (वय ४) असे मुलाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार शिवतेज घरासमोरील अंगणात खेळत होता. यावेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर हल्ला करत त्याला शेजारच्या शेतात उचलून नेले. त्याच्या आवाजाने घरातील लोक आणि आजूबाजूचे शेजारी बिबट्याच्या मागे धावले. पण तोपर्यंत या हल्ल्यात मुलाचा मृत्यू झाला होता. ही घटना घडल्यानंतर वनविभगाचे अधिकारी बराच वेळ घटनास्थळी दाखल न झाल्याने स्थानिकांनी मोठा रोष व्यक्त केला आहे.बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे.