मुंबई – पहिली ते आठवीच्या वर्गांचे शिक्षक होण्यासाठी अनिवार्य असलेली टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षा राज्य परीक्षा परिषदेतर्फे १० नोव्हेंबर रोजी घेतली जाणार आहे. त्यासाठी ९ ते ३० सप्टेंबर या कालावधीत अर्ज भरता येणार आहे. राज्य परीक्षा परिषदेचे उपायुक्त संजय राठोड यांनी याबाबतची माहिती प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली.
राज्यातील पहिली ते आठवीच्या सर्व माध्यमाच्या, सर्व व्यवस्थापनांच्या अनुदानित, विनाअनुदानित शाळांमध्ये शिक्षण सेवक, शिक्षक या पदांसाठी उमेदवार टीईटी उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. त्यानुसार ही परीक्षा घेतली जाणार आहे.२८ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत परीक्षेसाठीच्या प्रवेशपत्राची मुद्रित प्रत काढून घेता येणार आहे. अर्ज भरणे,शुल्क याबाबतची माहिती परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.१० नोव्हेंबर रोजी या परीक्षेतील २ पेपर होणार आहेत. सकाळी साडेदहा ते एक या वेळेत पहिला पेपर,तर दुपारी दोन ते साडेचार या वेळेत पेपर २ होणार आहे.