जयपूर – शिक्षकांसाठी असलेल्या पाण्याच्या भांड्यातून पाणी प्यायल्याने दलित विद्यार्थ्याला बेदम मारहाण झाल्याची घटना राजस्थानमध्ये घडली आहे. पीडित विद्यार्थ्याच्या पाठीवर जखमा झाल्या आहेत. या प्रकरणानंतर पीडित विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी सदर शिक्षकालाही मारहाण केल्याचे समजते.
८ सप्टेंबर रोजी राजस्थानच्या भरतपूर येतील सरकारी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला तहान लागल्याने त्याने शाळेतील पाण्याच्या टाकीतून पाणी घ्यायचा प्रयत्न केला. मात्र, टाकी रिकामी असल्याने त्याने शिक्षकांच्या खोलीत असलेल्या पाण्याच्या कॅम्परमधून पाणी घेतले.
हा प्रकार समजल्यानंतर गंगाराम गुर्जर नावाच्या शिक्षकाने विद्यार्थ्याला मारहाण करायला सुरुवात केली. या विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी आणि काठीने मारण्यात आले. त्यात विद्यार्थ्याच्या पाठीला मार लागला. मुलाने ही बाब आपल्या कुटुंबाला सांगितली. त्यानंतर भीम आर्मीचे कार्यकर्ते आणि काही ग्रामस्थ दुसऱ्या दिवशी शाळेत गेले. या प्रकाराची माहिती मिळताच पोलीसही शाळेत दाखल झाले. दलित समुदायातील काहींनी गंगाराम गुर्जर याला मारहाण करायला सुरूवात केली. पोलिसांनी गुर्जर याची सुटका करून पोलीस स्टेशनमध्ये नेले आणि त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली.
शिक्षकांसाठीचे पाणी प्यायल्याने दलित विद्यार्थ्याला बेदम मारहाण
