*२० जणांचा नाहक बळी
जॉर्जटाऊन
शिक्षकांनी मोबाईल काढून घेतला, म्हणून रागाने एका विद्यार्थिनीने शाळेच्या वसतिगृहाला आग लावली. मुख्य दरवाजे बंद करून ठेवल्याने इतर विद्यार्थिनी आत अडकल्या. या आगीत शाळेचा काही भागही पेटला. ही घटना दक्षिण अमेरिकेत असणाऱ्या गुयाना देशात घडली. या घटनेत २० जणांना आपला जीव गमवावा लागला. महदीए सेकंडरी स्कूल असे या शाळेचे नाव असून गुयानामधील जॉर्जटाऊन शहरात ही शाळा आहे.
शाळेत येताना ही मुलगी आपल्यासोबत मोबाईल घेऊन आली होती. यावेळी तिच्या टीचरने हा मोबाईल पाहिला, आणि जप्त केला. दरम्यान, गर्ल्स हॉस्टेलच्या वॉर्डनसोबतही या मुलीचा वाद झाला होता. यावेळी झालेल्या वादामध्ये तिने शाळेला आग लावण्याची धमकी देखील दिली. त्यानुसार, विद्यार्थिनीने रात्रीच्या वेळी शाळेच्या गर्ल्स हॉस्टेलला आग लावली. हॉस्टेलचे मुख्य दरवाजे बंद करून ठेवले असल्यामुळे वेळेत बाहेर पडणे कित्येक मुलींना शक्य झाले नाही. यामुळे या आगीत कित्येक विद्यार्थिनी जखमी झाल्या. यामध्ये आग लावणाऱ्या मुलीचाही समावेश होता. या आगीमध्ये एकूण २० जणांचा मृत्यू झाला. यामध्ये १२ ते १८ वर्षांच्या मुलींचा समावेश आहे. या सर्व मुली आजूबाजूच्या लहान गावांमधून आल्या होत्या. यासोबतच, हॉस्टेल वॉर्डनच्या पाच वर्षांच्या मुलाचा देखील या आगीत बळी गेला. या आगीत जखमी झालेल्यांपैकी नऊ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले.