शिंदे-ठाकरे सत्तासंघर्षाचा निकाल
सुप्रीम कोर्ट मे महिन्यात देणार!

मुंबई- महाराष्ट्रात शिंदे आणि ठाकरे गटात सुरू असलेल्या सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयात 16 मार्च रोजी युक्तिवाद पूर्ण होऊन निकाल राखून ठेवण्यात आला. हा निकाल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखाली न्या. एम. आर. शहा, न्या. कृष्णमुरारी, न्या. पी. नरसिंह आणि न्या. हिमा कोहली या पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे या प्रकरणी प्रदीर्घ सुनावणी झाली. शिंदे गटाकडून निरज कौल आणि हरिश साळवे हे ज्येष्ठ वकील उपस्थित राहिले तर ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी आणि देवदत्त कामत यांनी युक्तिवाद केला. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यावर 16 मार्च रोजी न्यायालयाने निकाल राखीव ठेवला. मार्च महिना संपला तरी अद्याप निकाल देण्यात आलेला नाही.
याबाबत ‘नवाकाळ\’शी बोलताना कायदेतज्ज्ञ उल्हास बापट म्हणालेे की, सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवल्यावर निकाल देण्यास कालमर्यादा नाही. ते कधीही निकाल देऊ शकतात. हे प्रकरण महत्त्वाचे असून, त्याचे देशभरात परिणाम होणार आहेत. पाचही न्यायमूर्ती आपसात चर्चा करतील. प्रत्येकजण स्वतंत्र मतही मांडू शकतात. बहुमताने अंतिम निर्णय होईल. त्यामुळे या प्रक्रियेला वेळ लागतो.
सर्वोच्च न्यायालय मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निर्णय देण्याची शक्यता आहे. विद्यमान खंडपीठ निकाल देईल किंवा हे प्रकरण सात न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे वर्ग करील. विद्यमान खंडपीठातील न्या. एम. आर. शहा हे 15 मे रोजी निवृत्त होत असल्याने त्याआधी निकाल लागेल, असे सांगितले जात आहे. ते निवृत्त होण्यापूर्वी निर्णय आला नाही तर नवे खंडपीठ गठीत करून पुन्हा पहिल्यापासून सुनावणी घ्यावी लागेल.

Scroll to Top