नांदेड- नांदेड उत्तरचे शिवसेना शिंदे पक्षाचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी आपल्या प्रचाराचा नारळ आज मरळक येथे फोडला. मात्र ठिकाणी आयोजित केलेल्या प्रचारसभेसाठी वीजचोरी करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. कल्याणकर यांच्या प्रचारसभेसाठी विद्युत खांबावरून आकडे टाकून वीज घेण्यात आल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाने माजी महापौर अब्दुल सत्तार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. तर काँग्रेसच्या सत्तार यांच्याविरोधात शिंदेंच्या शिवसेनेने विद्यमान आमदार बालाजी कल्याणकर यांना पुन्हा एकदा मैदानात उतरवले आहे. बालाजी कल्याणकर यांनी आज प्रचाराचा नारळ फोडला. मात्र त्या ठिकाणी आयोजित प्रचार सभेसाठी विद्युत खांबावरुन आकडे टाकून वीज घेण्यात आल्याचा व्हिडियो व्हायरल झाला आहे. त्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाने प्रतिक्रिया देत म्हटले आहे की, हे तर चोरच आहेत, हे त्यांनी देवाच्या दारात सिद्ध करून दाखवले. या चोरांनी आधी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष चोरला, चिन्ह चोरले. आता यांनी वीजसुद्धा चोरली आहे. पण महादेवाच्या मंदिरात कधी चोरी लपत नाही.