शहापूर- वर्षा सहलीसाठी आपल्या मित्रांसोबत आलेला एक उत्तम जलतरणपटू आणि जीम ट्रेनर व रिल स्टार विनायक वाझे (३२)याचा ओव्हळाच्या वाहत्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. शहापूर तालुक्यातील शेणवे-खैरे रस्त्यावरील केरला व्हिलेज रिसॉर्टच्या मागील बाजूस ही घटना घडली. तब्बल २८ तासानंतर विनायकचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात जीवरक्षक पथकाला यश आले.
कल्याण येथून १२ तरुणांचा एक समूह वर्षा सहलीसाठी आला होता. यावेळी विनायक वाझे (२९) हा तरुण खैरे गावाजवळील दुथडी भरून वाहत असलेल्या ओव्हळात पोहण्यासाठी उतरला. मात्र पाण्याचा वेग व खोलीचा अंदाज न आल्याने तो वाहून गेला. सायंकाळी उशिरापर्यंत किन्हवली पोलिसांच्या सहकार्याने जीवरक्षक टीमने त्याचा शोध घेतला,मात्र तो सापडला नाही. अखेर काल सायंकाळी म्हणजे तब्बल २८ तासानंतर जीवरक्षक पथकाला विनायकचा मृतदेह सापडला . विनायक हा चांगला पट्टीचा पोहणारा असूनही त्याचा असा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.