शरद पवार-रिफायनरी आंदोलक भेट उदय सामंत आज पवारांना भेटणार

मुंबई – रत्नागिरीच्या बारसू पंचक्रोशीत तेल रिफायनरी आणण्यास ग्रामस्थांचा खंबीर विरोध झाल्याने तेथील माती परीक्षणाचा टप्पा थांबवावा लागला. परंतु या रिफायनरीला हिरवा कंदील मिळावा यासाठी केंद्राकडून प्रचंड दबाव येत असल्याने वेगाने घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज रिफायनरी विरोधी समितीच्या नेत्यांची यशवंतराव चव्हाण सेंटर येथे भेट घेतली. यावेळी दीड तास चर्चा झाली. उद्या उद्योग मंत्री उदय सामंत हे शरद पवारांना याच प्रश्‍नाबाबत भेटणार आहेत.
आज रिफायनरी विरोधी समितीचे सत्यजित चव्हाण, नरेंद्र जोशी, वैभव कोळवणकर, शंकर जोशी आदींनी शरद पवारांची भेट घेतली. यावेळी जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. तसेच शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी फोनवर चर्चा केली. ही बैठक संपल्यावर पत्रकारांशी बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, स्थानिकांची आधारकार्ड आहेत. त्यावरून त्यांची यादी करून रिफायनरीबाबत मतदान घ्यावे. म्हणजे रिफायनरीला पाठिंबा आहे की विरोध हे उघड होईल.
रिफायनरी विरोधी आंदोलकांनी शरद पवारांसमोर बाजू मांडताना म्हटले की, प्रत्येक गावातील सडा हा महत्त्वाचा असतो. सडा नष्ट झाला तर आंबा, काजू संपून जाईल. ही रिफायनरी येणार आहे त्याबरोबर पेट्रोकेमिकल पदार्थांची निर्मितीही तिथे होणार आहे. पॉलिमर, प्लास्टिक, बिटुमीन असे पेट्रोलियम पदार्थ तिथे उत्पादित होऊ लागले तर कोकण पूर्ण प्रदुषित होईल. गुजरात राज्यात दहेज येथे अशी रिफायनरी व पेट्रोकेमिकल इंडस्ट्री आल्यावर आता इतका विनाश झाला आहे की, तेथील लोक रडकुंडीला आले आहेत. तामिळनाडूच्या मनाली येथेही हीच स्थिती आहे. तेथील लोक सांगत आहेत की, रिफायनरी विध्वंसक आहे. ती येऊ देऊ नका. मग सरकार दडपशाही करून कोकणावर ही रिफायनरी का लादत आहे?
आंदोलकांनी शरद पवारांकडे मागणी केली की, रासायनिक उद्योग कोकणात नको आहेत, त्याऐवजी दुसरे उद्योग आणले तर आम्ही स्वागत करू. आंदोलकांची बाजू ऐकल्यावर शरद पवारांनी मुख्यमंत्री शिंदे आणि उदय सामंतांशी फोनवर चर्चा केली. आता उद्या शरद पवार आणि उदय सामंतांची प्रत्यक्ष भेट होणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top