शरद पवारांवर जहरी टीका केल्यानंतर भुजबळांची शरद पवारांकडेच धाव

बारामती – बारामतीचे पाणीच मोठे न्यारे आहे. तिथे जाणारे भले भले गोंधळून जातात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बारामतीत जाऊन पवार काका-पुतण्यावर गंभीर आरोप करीत या दोघांचा नाश करण्याचे आव्हान केले आणि निवडणुकीनंतर अजित पवारांना घेऊन भाजपाने शपथविधी केला. शेतकरी नेते राजू शेट्टी, महादेव जानकर यांनी बारामतीत जाऊन पवारांविरोधात आरोळ्या ठोकल्या आणि नंतर राष्ट्रवादीकडे अनेकदा मदतीची मागणी केली. आज छगन भुजबळांसारख्या दिग्गज नेत्याची तीच परिस्थिती पाहायला मिळाली. अजित पवार गटाच्या कालच्या मेळाव्यात शरद पवारांवर जहरी टीका केल्यानंतर 24 तासांतच भुजबळ भेटीची वेळही न घेता शरद पवारांच्या भेटीला धावले. शरद पवारांनी त्यांना दीड तास थांबवून ठेवले आणि भुजबळ थांबलेही. त्यानंतर दोघांची भेट झाली आणि महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ माजली.
शरद पवार आजारी असल्याने ते सर्व कार्यक्रम रद्द करून सिल्व्हर ओक या मुंबईतील आपल्या घरी विश्रांती घेत होते. तरीही विधान परिषदेची आमदारकी मिळाल्यावर बाहुबलीचा आशीर्वाद मिळावा यासाठी उबाठा गटाचे मिलिंद
नार्वेकर शरद पवारांच्या भेटीला पोहोचले. त्याचवेळी छगन भुजबळ यांचा ताफा शरद पवारांच्या भेटीसाठी निघाला आहे, अशी बातमी आली आणि राजकीय चर्चेला उत आला. छगन भुजबळ हे अजित पवार गटात नाराज असून, त्यांना उबाठा गटात पुन्हा प्रवेश करायचा आहे मात्र शरद पवारांनी याला विरोध केला असल्याने त्यांची समजूत काढण्यासाठी भुजबळ भेटीला जात आहेत असे काहींनी सांगितले. तर छगन भुजबळ हे शरद पवार गटात परत जाणार असल्याचीही चर्चा सुरू झाली. त्यातच छगन भुजबळ हे अजित पवार गटाच्या बड्या नेत्यांना न सांगता भेटीसाठी गेले आहेत हे लगेचच उघड झाले. अजित पवार, सुनील तटकरे यांना या भेटीची काही माहिती नव्हती. सुप्रिया सुळे यांना याबाबत विचारल्यावर त्यांनी तर आश्‍चर्य व्यक्त केले.
छगन भुजबळ हे सिल्व्हर ओकवर पोहोचल्यानंतर त्यांना दीड तास बसून राहावे लागले. त्यानंतर भुजबळ आणि शरद पवार यांची दीड तास भेट झाली. छगन भुजबळ हे ओबीसींचे नेतृत्त्व करीत आहेत. मात्र ते अजित पवार गटात असल्याने त्यांना अडचणी येत आहेत. अजित पवार गट हा भाजपासोबत असल्याने भुजबळांना वेगळा निर्णय घ्यायची वेळ आली असल्याचे मत त्यांच्याच समता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केले होते. दुसरीकडे मराठा आरक्षण नेते जरांगे-पाटील यांचाही भुजबळांना कडाडून विरोध होत आहे. भुजबळांना लोकसभा आणि त्यानंतर राज्यसभेचे तिकीट या कारणामुळेच कापले गेले. या सर्व घडामोडींमुळे भुजबळ कोंडीत सापडले आहेत. काल बारामतीत झालेल्या मेळाव्यात त्यांनी शरद पवारांवर निशाणा साधत ओबीसींबाबत सर्वपक्षीय आमदारांची बैठक बोलावल्यानंतर बारामतीहून फोन आला आणि मविआचे नेते माघारी फिरले असे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्याने खळबळ माजली होती. त्यानंतर 24 तासांतच भुजबळ हे सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या भेटीची वाट पाहत बसले होते.
शरद पवारांची भेट घेऊन स्वत:च्या बंगल्यावर पोहोचल्यानंतर पत्रकारांशी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, मी आज पवारांकडे गेलो होतो. त्यांची आधी वेळ घेतली नव्हती. त्यांची तब्येत बरी नसल्याने ते झोपले होते. दीड तासांनी त्यांनी मला बोलावले. ते बिछान्यातच झोपले होते. मी खुर्ची घेऊन त्यांच्या जवळ बसलो आणि आम्ही दीड तास चर्चा केली. ओबीसी आणि मराठा समाज यांच्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, हे वातावरण शांत करण्यासाठी तुम्हीच पुढाकार घ्या, अशी मी त्यांना विनंती केली. ओबीसींना आरक्षण तुम्ही दिले आणि आता राज्यातील काही जिल्ह्यांत ओबीसी आणि मराठा यांच्यात स्फोटक स्थिती निर्माण झालेली असताना तुम्ही पुढे होऊन काही प्रयत्न केले पाहिजेत. मराठा समाजाचे हॉटेल असेल तर ओबीसी तिकडे फिरकत नाहीत. ओबीसी, धनगराचे दुकान असेल तर मराठा तिकडे जात नाहीत. राज्याचे ज्येष्ठ नेते म्हणून तुम्ही शांतता निर्माण करण्याचा
प्रयत्न करा.
छगन भुजबळ पुढे म्हणाले की, मी विनंती केल्यानंतर शरद पवार म्हणाले की, जरांगे यांना भेटायला मंत्री गेले होते. जरांगे आणि मंत्री यांच्यात काय चर्चा झाली याची मला माहिती नाही. यावर मी शरद पवारांना सांगितले की, आपण मुख्यमंत्र्यांना याबाबत माहिती विचारा. कारण या भेटीत काय झाले याची माहिती मला नाही. मग त्यांनी ओबीसी नेते हाकेंशी काय चर्चा झाली हे विचारले, तेव्हा मी त्यांना सांगितले की, आपण उपोषण सोडून चर्चा करावी. इतकीच मी त्यांना विनंती केली होती.
भुजबळ अखेरीस म्हणाले की, शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. राज्यातील स्थितीची त्यांना सखोल माहिती आहे. आम्ही मंत्री असलो तरी कुठे काय चालले हे त्यांना व्यवस्थित माहीत असते. तेव्हा त्यांना पुढाकार घेऊन तणावाचे वातावरण कमी करावे, शांतता प्रस्थापित होईल यासाठी प्रयत्न करावे, त्यासाठी बैठक बोलवायची असेल तर बैठक बोलवावी, अशी मी त्यांना विनंती केली. त्यावर शरद पवार यांनी म्हटले की, मी एक-दोन दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि एक-दोघांशी चर्चा करतो आणि एक बैठक बोलावून यातून मार्ग काढायचा प्रयत्न करतो.
भुजबळ यांनी शेवटी स्पष्ट केले की, मी स्वत:हून या भेटीसाठी गेलो होतो. मी जाणार असल्याचे फक्त प्रफुल्ल पटेल यांना सांगितले होते आणि त्यांनी मला परवानगी दिली होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top