अहमदनगर- शरद पवारांना एवढीच विनंती आहे की, तुम्ही जाणते राजा आहात. पण आता जनताजनार्दन तुम्ही गमावली आहे. आता कामयस्वरुपी घरी बसा. अनेकजणांचे वाटोळे केले आहे, आता जनतेचे आणि राज्याचे वाटोळे करू नका, अशी खरमरीत टीका भाजपा नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली. अहिल्यानगरमधील लोणी येथे ग्रामदैवत म्हसोबा महाराजांच्या यात्रेच्या नियोजनासाठी घेतलेल्या ग्रामस्थांच्या बैठकी ते बोलत होते.
यावेळी त्यांनी ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप करणाऱ्या विरोधकांनाही फटकारले. ते म्हणाले की, लोकसभेत आघाडीला घवघवीत यश मिळाले. महायुतीची पिछेहाट झाली, त्यावेळी ईव्हीएमवर का शंका व्यक्त केली नाही? ईव्हीएमवर विश्वास नाही म्हणून त्यांच्या खासदारांनी त्यावेळी राजीनामा द्यायला हवा होता. निवडणूक नाकारायला हवी होती. सर्वोच्च न्यायालयाने देखील स्पष्ट भाषेत सांगितले आहे. जनमत बाजूने असले की ईव्हीएम चांगले आणि विरोधात गेले की ईव्हीएम वाईट, हे चुकीचे आहे.