शरद पवारांची बीड-परभणी भेट! आम्ही न्याय देऊ! पवारांनी वातावरण तापवले

बीड – शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी आज बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथे येऊन हत्या झालेले सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. मस्साजोगनंतर त्यांनी परभणीमध्ये जाऊन पोलीस कोठडीत मृत्युमुखी पडलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांचीही भेट घेतली. दोन्ही कुटुंबांचे सांत्वन करून त्यांनी तुमच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवून न्याय मिळून देऊ, असा दिलासाही दिला. या दोन्ही प्रकरणांवरून विरोधकांनी सरकारला घेरले असतानाच शरद पवार यांनी बीड-परभणीचा दौरा केल्याने राजकारण आणखी तापले आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग या गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे सूत्रधार पकडण्याची आणि आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी सुरू आहे. त्याचप्रमाणे परभणीत काही दिवसांपूर्वी संविधान प्रतिकृतीची विटंबनेच्या घटनेनंतर हिंसाचार झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा न्यायालयीन कोठडीत संशयास्पद मृत्यू झाला होता. ही दोन्ही प्रकरणे राज्याच्या हिवाळी अधिवेशनात आणि संसदेतही उपस्थित झाली होती. यावरून राज्यात असंतोष असताना शरद पवार आज बीडमधील मस्साजोग आणि परभणी येथे पोहोचले. मस्साजोगमध्ये शरद पवार यांनी देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली, तेव्हा त्यांच्यासोबत खासदार नीलेश लंके, खासदार बजरंग सोनावणे आणि माजी मंत्री राजेश टोपे होते. यावेळी शरद पवार यांनी देशमुख कुटुंबियांची विचारपूस केली. ही घटना कशी घडली? नेमके काय घडले? याची माहिती घेतली. यावेळी कुटुंबातील आणि गावातील लोकांनी शरद पवार यांच्यासमोर तक्रारीचा पाढा वाचला. संतोष देशमुख यांनी गावाला 19 पुरस्कार मिळवून दिले होते. एवढ्या मोठ्या माणसाला मारून टाकले. सरपंचाला मारणारे आरोपी आमच्या गावातील नाहीत. आमच्या गावातील लोक गुण्यागोविंदाने राहतात. आमच्यात भांडणे नब्हीत.

निवडणुकीनंतरही आम्ही एकत्र असतो. त्यानंतर शरद पवार म्हणाले की, मस्साजोग गावात सध्या प्रचंड दहशतीचे वातावरण आहे. कृपा करून या दहशतीमधून बाहेर पडा. या सगळ्याला आपण मिळून तोंड देऊ. एकदा सगळ्यांनी सामूहिक प्रयत्नांची भूमिका घेतल्यावर आपल्याला कोणी अडवू शकत नाही. केंद्र सरकार, राज्य सरकार, बीडचे लोकप्रतिनिधी, वकील मंडळी आणि जिल्ह्यातील व राज्यातील लोक तुमचे हितचिंतक म्हणून गावकरी आणि देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी आहेत.
शरद पवार पुढे म्हणाले की, राज्य सरकारने त्यांच्या कुटुंबियांना मदत जाहीर केली आहे. पण या मदतीने दु:ख कमी होत नाही, त्यामुळे या हत्या प्रकरणाचा तपास खोलात तपास करून सूत्रधारांना धडा शिकवला पाहिजे. देशमुख कुटुंबाला न्याय दिला पाहिजे. आम्ही त्यांच्यासोबत आहोत. महाराष्ट्रात अशी घटना घडते हे न शोभणारे आहे. या दु:खात देशमुख कुटुंब एकटे नाही. त्यांच्या दु:खात आम्ही सगळे सहभागी आहोत. कुटुंबात लहान मुले आहेत. त्यांच्या मुलीला मी आताच सांगितले की, तुझ्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घ्यायला तयार आहे. या मुलांचे आपण पूर्ण शिक्षण करू. जे झाले आहे ते आपण बदलू शकत नाही. पण आपण त्यांना धीर देऊ शकतो. आत्मविश्वास वाढवू शकतो. ते एकटे नाहीत ही भावना निर्माण करू शकतो. ते काम आपण सगळे मिळून करू. राज्य सरकार आणि केंद्र सरकार याच्या खोलात जात नाही तोपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही, हा विश्वास देतो.
यावेळी शरद पवार यांनी बजरंग सोनावणे, नीलेश लंके आणि जितेंद्र आव्हाड या तीन नेत्यांचे संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मुद्दा लावून धरल्याबद्दल कौतुक केले. त्यानंतर शरद पवार परभणीला रवाना झाले. संविधान शिल्पाच्या मोडतोड झाल्याची घटना घडल्यानंतर परभणीत जो हिंसाचार उसळला होता. त्या प्रकरणी पोलिसांनी अनेकांची धरपकड केली होती. त्यात सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचाही समावेश होता. त्याचा न्यायालयीन कोठडीत संशयास्पद मृत्यू झाला. शरद पवारांनी परभणीत सूर्यवंशी कुटुंबाची भेट घेतली. कालच फडणवीस यांनी विधानसभेत असे सांगितले होते की, सोमनाथला कोठडीत मारहाण झाली नाही. त्याला आधीपासून आजार होता. शरद पवारांनी सूर्यवंशी कुटुंबाची भेट घेतली तेव्हा त्यांनी फडणवीसांचे हे आरोप फेटाळून लावले. फडणवीसांनी या प्रकरणात चुकीची माहिती दिल्याचा दावा करत कुटुंबियांनी म्हटले की, आमचा मुलगा आंदोलनातही नव्हता. त्याची कोणतीही चूक नसताना पोलिसांनी त्याला पकडले. पोलिसांनी मारहाण करून त्याचा जीव घेतला. सोमनाथला कोणताही आजार नव्हता. त्याची हत्या केली आहे. त्याच्या मारेकर्‍यांना फाशी द्या. त्याचा फोन अद्याप पोलिसांकडे आहे. त्यातील डेटा डिलीट केला जाऊ शकतो.
यावेळी सोमनाथच्या कुटुंबियांनी पवारांनी सोमनाथच्या समाजकार्याची माहिती देणारी कागदपत्रे दाखवली. शरद पवारांनी सूर्यवंशी कुटुंबाचे सांत्वन करत त्यांना धीर दिला. ते म्हणाले की, घरातील कर्त्या मुलाचे निधन होणे धक्कादायक आहे. देवाघरी गेलेला मुलगा आता परत येऊ शकत नाही. मुलगा गमावण्याचे दु:ख मोठे आहे. ते सोसणे सोपे नाही. या प्रकरणातील दोषींवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे. आम्ही तुमच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवू. तुम्हाला न्याय मिळवून देऊ,’ यानंतर शरद पवार यांनी परभणीमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले.

नवनीत कावत बीडचे पोलीस नवे अधीक्षक
मस्साजोग प्रकरणी विरोधकांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची उचलबांगडी केली होती. त्यांच्या जागी आज नवनीत कावत यांची नियुक्ती केली. कावत यापूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीस उपायुक्त होते.

राहुल गांधी उद्या परभणी दौर्‍यावर
परभणी हिंसाचारात न्यायालयीन कोठडीत संशयास्पदरित्या मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी परवा परभणीच्या दौर्‍यावर येणार आहेत. ते दुपारी दिल्लीवरून विशेष विमानाने नांदेडला येतील. तिथून रस्तेमार्गे परभणीला पोहोचतील. त्यांच्यासोबत नाना पटोले, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आदी नेते उपस्थित राहणार आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top