नवी दिल्ली – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज 85 वा वाढदिवस होता. यानिमित्त त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार, सुप्रिया सुळे, सदानंद सुळे, योगेंद्र पवार दिल्लीत त्यांचा वाढदिवस साजरा करीत असतानाच अजित पवार, पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांच्यासह अजित पवार गटाचे महाराष्ट्रातील सर्व दिग्गज नेते शरद पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या 6 जनपथ या शासकीय बंगल्यावर दाखल झाले. या भेटीने महाराष्ट्रातील जनता अचंबित झाली. निवडणुकीत एकमेकांवर अत्यंत कडवी टीका करणारा गट, दिवाळी व भाऊबीज एकत्र साजरा न करणारा गट जेव्हा ‘ही आमची संस्कृती आहे’ असे सांगत भेटतो तेव्हा सामान्य माणसाला ही खरोखर आपली संस्कृती आहे की, हे निव्वळ दिखाव्याचे राजकारण आहे असा प्रश्न पडतो.
शरद पवार यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत होता. पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करून त्यांना शुभेच्छा दिल्या. नीलेश लंके यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शरद पवार यांनी तलवारीने वाढदिवसाचा केक कापला. हे सोहळे सुरू असतानाच अजित पवार, सुनेत्रा पवार, मुलगा पार्थ पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार प्रफुल्ल पटेल, आमदार छगन भुजबळ आदी प्रमुख नेते त्यांच्या भेटीसाठी आले. सुप्रिया सुळे यांनी त्यांचे हसून स्वागत केले. त्यांनी शरद पवार यांची 20 मिनिटे भेट घेतली.
या भेटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, आज शरद पवारांचा वाढदिवस आहे. उद्या काकींचा वाढदिवस आहे. त्याअनुषंगाने त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो होतो. भेटीदरम्यान सध्या सुरू असलेल्या घडामोडींवर चर्चा झाली. यामध्ये परभणीची दंगल, लोकसभा व राज्यसभा कामकाज, राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार, महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन या मुद्यांवर चर्चा झाली. राजकारणात टीका-टिप्पणी व्यतिरिक्त संबंध असतात. महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण यांनी सुसंस्कृत राजकारणाची शिकवण दिली आहे. त्याप्रमाणे आम्ही काम करण्याचा प्रयत्न करत आहोत. छगन भुजबळ म्हणाले की, त्यांना शुभेच्छा द्यायला दरवर्षी येतो. इतकी वर्षे त्यांच्यासह काम केले, आमचे स्नेहसंबंध आहेतच. त्यांच्या आरोग्याची चौकशी केली. इतर काही चर्चा झाली नाही. अजित पवार व शरद पवार भेटीवर युगेंद्र पवार म्हणाले की, अजित पवार भेटीसाठी येणार होते हे मला माहिती नव्हते. मात्र त्यांची आजची भेट ही शंभर टक्के कौटुंबिक होती. पवार कुटुंबाने नेहमीच राजकीय आणि कौटुंबिक संबंध हे वेगळे ठेवले आहेत. निवडणूक काळात टीका करताना पवार कुटुंबाने कधी पातळी सोडली नाही. राजकारण आणि विचार हे वेगळे असले पाहिजे. आता विचार वेगळे झाले आहेत. परंतु कुटुंब नेहमी एकत्र आले पाहिजे. दिवाळी पाडवा समारंभाबाबत ते म्हणाले, यावर्षी निवडणुका आणि दिवाळी पाडवा एकत्र आले. त्यामुळे त्यांनी वेगळा पाडवा घ्यायचा निर्णय घेतला असेल. पण, पुढच्या वर्षी एखाद्या वेळी पाडवा आम्ही एकत्रित घेऊ.