मुंंबई – 1 मे रोजी मुंबईत महाविकास आघाडीची महत्त्वाची वज्रमूठ सभा होणार आहे. मात्र मविआला पुन्हा धक्का देत या सभेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारच उपस्थित राहणार नाहीत. याआधी नागपूर येथील वज्रमूठ सभेला अजित पवार यांनी उपस्थित राहूनही भाषण केले नव्हते. आता शरद पवार मुंबईच्या सभेला अनुपस्थित राहणार असल्याने चर्चेला उधाण आले आहे.
पवार सभेला का जाणार नाहीत, याबाबत अद्याप कोणतीही माहिती कळलेली नाही. शरद पवार वज्रमूठ सभेला हजर राहणार नसल्याची बातमी येत असतानाच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 27 एप्रिलला महाराष्ट्र दौर्यावर येणार आहेत.
दोन दिवसांपूर्वी शरद पवार यांनी मविआबद्दल सूचक वक्तव्य केले होते. ’मविआ आज आहे, उद्या सांगता येत नाही’, असे वक्तव्य त्यांनी केले होते. त्याची चर्चा झाल्यावर, ’जागावाटपाबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, त्यामुळे मी असे म्हटले होते. माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ काढण्यात आला’, अशी सारवासारव त्यांनी केली होती. त्यानंतरही राष्ट्रवादीकडे संशयाने पाहिले जाते.
शरद पवार यांच्या या सूचक वक्तव्यामुळे काँग्रेस आणि ठाकरे गट शिवसेनेचे टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. पवार यांनी विधान केल्यावर लगेचच ते वज्रमूठ सभेला हजर राहणार नसल्याची बातमी समोर आल्याने पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, शरद पवार यांनी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांपेक्षा वेगळी राजकीय भूमिका घेतल्याने काँग्रेस नेते सावध झाले आहेत. सोमवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत टिळक भवनात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची 1 मे रोजी मुंबईत होणार्या वज्रमूठ सभेच्या नियोजनासाठी बैठक झाली. या बैठकीत भाजपशी एकट्याने लढण्याच्या तयारीवरही चर्चा करण्यात आली. तसेच शरद पवार आणि अजित पवार यांच्या माध्यमातून भाजप महाविकास आघाडी फोडणार आहे का, या शक्यतेवरही चर्चा झाली. शरद पवारांनी यापूर्वी अचानक काँग्रेसशी युती तोडून भाजपला अप्रत्यक्षपणे कशी मदत केली होती. याचा उल्लेखही बैठकीत झाला. त्यामुळेच नाना पटोले म्हणाले की, ’आमची भूमिका स्पष्ट आहे, जे पक्ष बरोबर येतील त्यांना बरोबर घेऊन लोकशाही व संविधान वाचवण्याचा लढा देऊ.’
गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते महाविकास आघाडीत फूट पाडणारी वक्तव्ये करत आहेत. वीर सावरकरांच्या मुद्यावर राष्ट्रवादीने राहुल गांधींपेक्षा वेगळी भूमिका घेतली होती. उद्योगपती गौतम अदानी यांची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी व्हावी, या काँग्रेसच्या मागणीच्या बाबतीत शरद पवार यांनी वेगळे मत व्यक्त केले होते. दुसरीकडे अजित पवार हेही सातत्याने भाजपचे समर्थन करताना दिसत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवीच्या मुद्यावरून काँग्रेस नेते भाजपला घेरत असताना अजित पवार यांनी पंतप्रधानांची बाजू घेतली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटातील 16 आमदारांना अपात्र ठरवले तरी शिंदे-फडणवीस सरकार पडणार नाही, असे विधान राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ यांनीही नुकतेच केले. याप्रकारे महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेनेच्या (ठाकरे गट) नेत्यांचे मनोधैर्य खच्ची करणारी अनेक विधाने राष्ट्रवादीचे नेते करत आहेत. त्यामुळेच शरद पवारांपासून राजकीयदृष्ट्या सावध राहून काँग्रेस नेत्यांनी राज्यात प्लॅन-बी तयार करून कामाला सुरुवात केली आहे.
दरम्यान, अमित शहा 27 एप्रिलला नागपूरला येणार आहेत. तीन महिन्यांत शहा यांचा हा दुसरा नागपूर दौरा आहे. राष्ट्रीय कॅन्सर रुग्णालयाच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहाणार आहेत. गर्दी टाळण्यासाठी आणि तापमानाचा वाढता पारा लक्षात घेऊन या दौर्यात कोणतेही शक्तीप्रदर्शन होणार नसल्याचे कळते.
शरद पवारांचा पुन्हा मविआला धक्का महत्त्वाच्या वज्रमूठ सभेलाच जाणार नाहीत
