शमीला उच्‍च न्‍यायालयाचा दिलासा
अटक वॉरंटवरील स्‍थगिती कायम

कोलकाता

भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमीला कोलकाता उच्‍च न्‍यायालयाने दिलासा दिला. कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी शमीच्‍या अटक वॉरंटवरील स्‍थगिती रद्द करण्यास न्यायालयाने नकार दिला. शमीच्या पत्‍नीने २०१८ मध्‍ये कौटुंबिक हिंसाचारप्रकरणी तक्रार दाखल केली होती. यात शमीने तिच्यावर प्राणघातक हल्‍ला केल्‍याचा आरोपही केला होता.

मोहम्मद शमीच्‍या अटकेला सत्र न्‍यायालयाने स्‍थगिती दिली होती. तसेच या निर्णयावरील फेरविचाराची सुनावणी होणार होती. त्‍यामुळे या प्रकरणी सत्र न्‍यायालयाच्‍या निर्णयात उच्‍च न्‍यायालयाने हस्‍तक्षेप करण्‍याची आवश्‍यकता नाही, असे कोलकाता उच्‍च न्‍यायालयाचे न्‍यायमूर्ती शम्‍पा दत्त यांच्‍या खंडपीठाने स्‍पष्‍ट केले. \’शमीचे अनेक महिलांशी अनैतिक संबंध असल्याने त्याला विरोध केल्‍याने २३ फेब्रुवारी २०१८ रोजी त्याने माझ्यावर प्राणघातक हल्‍ला केला,\’ अशी तक्रार त्याच्या पत्‍नीने पोलिसात दाखल केली. त्यानुसार मार्च २०१८ मध्ये जाधवपूर पोलिस ठाण्‍यात कौटुंबिक हिंसाचारा गुन्‍हा या अंतर्गत शमी व त्‍याच्‍या नातेवाईकांविरोधात गुन्‍हा दाखल झाला.

न्‍यायालयाने २९ ऑगस्‍ट २०१९ रोजी अटक वॉरंट जारी केले. शमीने या वॉरंटला स्‍थगिती मिळण्‍यासाठी अलिपूर सत्र न्‍यायालयात धाव घेतली. ९ सप्‍टेंबर २०१९ रोजी अलीपूर सत्र न्‍यायालयाने शमीच्‍या अटकेला स्‍थगिती दिली. त्याच्या पत्‍नीने या आदेशाविरोधात कोलकाता उच्‍च न्‍यायलयात याचिका दाखल केली.

Scroll to Top