उज्जैन- मध्य प्रदेशच्या उज्जैनमधील प्रसिध्द महाकाल मंदिराच्या बाबा महाकाल यांच्या मिरवणुकीबाबत एक वेगळा वाद रंगला आहे. अकराशे वर्षांची परंपरा लाभलेल्या या मिरवणुकीला आजपर्यंत ‘शाही सवारी’ असे म्हटले जात होते. मात्र मध्य प्रदेशमधील साधु-संत, इतिहासकार आणि भाजपा नेते यांनी आता शब्दांमध्येही हिंदू मुस्लिम असा भेद आणून वादंग निर्माण केला आहे. त्यांनी आता ‘शाही ‘या शब्दावरच आक्षेप घेतला आहे. शाही हा इस्लामी शब्द आहे. त्यामुळे या शब्दाचा वापर हिंदूंच्या देवतांबाबत केला जाऊ नये. त्याऐवजी ‘राजसी’हा शब्द वापरावा, अशी मागणी हिंदुत्ववाद्यांनी केली आहे.
श्रावण महिन्यात दर सोमवारी महांकाल मंदिरातून बाबा महांकाल यांची मिरवणूक काढली जाते. भाद्रपद महिन्यातील पहिल्या सोमवारी बाबा महांकाल यांची अखेरची मिरवणूक निघते. चांदीने मढविलेल्या आणि रंगीबेरंगी फुलांची आकर्षक सजावट केलेल्या रथामध्ये बाबा महांकाल यांची मिरवणूक संपूर्ण उज्जैन शहरातून मार्गक्रमण करते. संपूर्ण शहर या मिरवणुकीच्या रंगात रंगून जाते. मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी लाखोंच्या संख्यने भाविक उज्जैनमध्ये येतात. सोमवारी या शाही स्वारीचा भाविकांमध्ये उदंड उत्साह दिसून आला. मात्र त्याचवेळी शाही शब्दावरून वाद सुरू झाला होता.
वर्षानुवर्षे शाही सवारी असेच या मिरवणुकीला म्हटले जाते. आता त्यातील शाही या शब्दावर साधु-संत, भाजपा नेते आणि हिंदू भाविकांनी आक्षेप घेतला आहे. पाताळेश्वर पीठाचे पीठाधिश्वर बालक दास यांच्यासह मध्य प्रदेशमधील अनेक साधु-महंत, भाजपा नेते यशपाल सिंग सिसोदिया यांनी म्हटले की शाही शब्द हा मोगलशाहीचे स्मरण करून देणारा आहे. यातून गुलामीची आठवण होते. हा शब्द हटावा. सनातन धर्मात असे शब्द नको. इतिहासकार नीरज सक्सेना म्हणाले की शाही हा शब्द शहा पासून बनलेला उर्दू शब्द आहे. आपण राजसी हा शब्द वापरला पाहिजे. मध्यप्रदेशचे भाजपाचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनीही काल या मिरवणुकीचा उल्लेख जाणीवपूर्वक शाही सवारी असा न करता राजसी सवारी असा केला.
शाही हा मूळचा फारसी शब्द असून तो या भाषेतून उर्दूत आला आहे. त्याचा अर्थ राजवट, शासन, सरकार असा होता. शाही हे अंतर मोजण्याचेही एक परिमाण आहे. तसेच एका पक्ष्याचेही ते नाव आहे. महाराष्ट्रात इतिहास काळात असलेल्या पाच शाह्यांमुळे हा शब्द मराठी भाषेतही
रूजला आहे.