कोची – शबरीमला देवस्थानातील सोन्या चांदीचे दागिने, इतर मौल्यवान रत्ने, विविध भांडी आणि इतर जंगम मालमत्तेची माहिती सार्वजनिक करण्यास त्रावणकोर देवस्वम समितीने नकार दिला आहे. केरळ उच्च न्यायालयात आपली बाजू मांडताना त्यांनी म्हटले आहे की, यामुळे मंदिराच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो.केरळ उच्च न्यायालयात इर्नाकुलम येथे राहणारे एम.के. हरिदास यांनी शबरीमला व गुरुवायुर देवस्थानाच्या संपत्तीची माहिती सार्वजनिक करण्याची मागणी केली होती. त्यावरी सुनावणी दरम्यान देवस्थान समितीचे सरचिटणीस यांनी आपले उत्तर दिले आहे. ही माहिती सार्वजनिक करण्याला नकार देताना त्यांनी म्हटले आहे की, संबंधित प्रशासकीय यंत्रणेकडून दरवर्षी या मालमत्तेची मोजणी होत असते. त्याची नोंदही ठेवली जाते. त्याचप्रमाणे देवस्थानाच्या संपत्तीची माहिती ही माहिती अधिकाराच्या कक्षेत येत नाही. त्यामुळे ही माहिती सार्वजनिक करु नये. या माहितीमुळे देवस्थानाच्या सुरक्षेलाही धोका पोहोचू शकतो. गुरुवायुर देवस्थानाने आपले उत्तर देण्यासाठी अधिक वेळ मागितला असून या प्रकरणाची पुढील सुनावणी आता २२ मे रोजी होणार आहे.
शबरीमला देवस्थानाच्या संपत्तीची माहिती देण्यास समितीचा नकार
