वॉशिंग्टन -अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उद्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्या शपथविधीपूर्वीच देशाच्या अनेक भागात त्यांच्याविरोधात निदर्शने सुरू झाली आहेत. काल पीपल्स मार्च या बॅनरखाली अनेक स्वयंसेवी संस्थांनी देशाच्या वेगवेगळ्या भागांत निदर्शने केली.ट्रम्प यांच्या धोरणांविरोधात ही निदर्शने करण्यात आली असून ट्रम्प यांच्या बरोबरच त्यांच्या निकटवर्तीयांचा व मस्क यांचाही पोस्टरद्वारे निषेध केला. याच संस्थांनी २०१७ साली झालेल्या ट्रम्प यांच्या पहिल्या शपथविधीलाही विरोध केला होता.दरम्यान आपल्या शपथविधीसाठी डोनाल्ड ट्रम्प राजधानी वॉशिंग्टनला पोहोचले आहेत. ट्रम्प यांनी काल दुपारी फ्लोरिडा येथील वेस्ट पाम बीच येथून हवाई दलाच्या सी-३२ लष्करी विमानातून उड्डाण केले होते. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी मेलानिया आणि मुलगा बॅरन ट्रम्पदेखील आहेत. ट्रम्प यांच्या या विमानाला स्पेशल एअर मिशन ४७ असे नाव देण्यात आले असून ट्रम्प हे अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष बनणार असल्यामुळे हे नाव देण्यात आले आहे. शपथविधी नंतर ट्रम्प १०० हून अधिक आदेशांवर स्वाक्षरी करणार आहेत. हे आदेश त्यांच्या टीमने आधीच तयार केले आहेत.
शपथविधीपूर्वी डोनाल्ड ट्रम्पच्या विरोधात पीपल्स मार्चची निदर्शने
