शनि मंदिरात स्थानिकांना
मोफत व्हीआयपी दर्शन

नेवासा – नेवासा तालुक्यातील शनि शिंगणापूर देवस्थान ट्रस्ट कडून परिसरातील भाविकांना मोफत व्हीआयपी दर्शन दिले जाणार आहे. देवस्थानचे अध्यक्ष भागवत बनकर यांनी आज रविवारी एका बैठकीत ही घोषणा केली.

बनकर यांनी सांगितले की परिसरातील स्थानिक भाविकांना मोफत दर्शन देऊ व स्थानिक असल्याचे तपासण्यासाठी आधार कार्ड गृहीत धरून व्हीआयपी दर्शन उपलब्ध करून देऊ व शनि महाराजांच्या मूर्तीवर सर्वांनाच तेल वाहण्यासाठी व शनिमहाराजांचे पावित्र्य राखण्यासाठी एका तेलकुंडाची निर्मिती करू म्हणजे भाविक स्त्री असो अथवा पुरुष त्या तेल कुंडात तेल वाहतील चौथरा वाढवून घेवून संरक्षण कथडे मूर्ती पासून आणखी दूर करू म्हणजे कुणाचाही हात मूर्तीला लागणार नाही. दर्शन रांगेचे बांधकाम व इतर कामे प्रगतीपथावर असून दोन महिन्यात ते पूर्ण करून भाविकांना सुखद दर्शन देण्याची व्यवस्था आम्ही करणार आहोत.

शनि चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या पाचशे रुपयांच्या विषयावर देवस्थान ट्रस्ट आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी यांची संयुक्त घेवून सर्व मान्य तोडगा काढू असे प्रतिपादन माजी मंत्री आ.शंकरराव गडाख यांनी नुकतेच प्रहार सोबत झालेल्या बैठकीत केले होते. त्यानुसार शनि देवस्थान ट्रस्ट कमिटी व प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकाऱ्यांच्या सोबत संयुक्त बैठकीचे रविवारी आयोजन करण्यात आले होते.

प्रहार जनशक्ती पक्षाने पुकारलेले आंदोलन होण्याआधीच आमदार शंकरराव गडाख यांनी घडवून आणलेल्या समन्वय बैठकीमध्ये चांगले निर्णय झाले असल्याने प्रहार जनशक्ती पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आमदार शंकरराव गडाख व शनि देवस्थान ट्रस्ट कमिटीचे आभार मानले.

Scroll to Top