मुंबई – आता महाराष्ट्रातील तीन मोठे द्रुतगती महामार्ग एकमेकांना जोडले जाणार आहेत, ज्यामुळे राज्यभर एक गतीशील महामार्ग ग्रीड तयार होणार आहे. यामध्ये मुंबई-गोवा महामार्ग, नागपूर-गोवा शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग आणि मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग यांचा समावेश असणार आहे.
नागपूर – गोवा शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग आणि मुंबई-गोवा कोकण द्रुतगती महामार्ग यांना समृद्धी महामार्गाशी जोडले जाणार आहे.यामुळे संपूर्ण महाराष्ट्र एका एक्सप्रेसवे नेटवर्कने जोडला जाणार आहे,यामुळे वाहतुकीचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. शक्तीपीठ महामार्गासाठी भूसंपादन सुरू झाले आहे, लवकरच प्रत्यक्ष काम सुरू होणार आहे.१२ वर्षांपासून रखडलेले मुंबई-गोवा महामार्गाचे काम शेवटच्या टप्प्यात आले आहे.४६६ किमी महामार्गाचे रुंदीकरण पुढील ५ महिन्यांत पूर्ण होण्याची शक्यता आहे.हे काम पूर्ण झाल्यावर मुंबई ते गोवा फक्त ६ तासांत पोहोचता येईल. या महामार्गावर ४१ बोगदे आणि २१ पूल तयार करण्यात येणार आहेत. तसेच शक्तिपीठ द्रुतगती महामार्ग हा तब्बल ८०२ किमी लांबीचा महामार्ग आहे. हा महामार्ग ८६,००० कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणार आहे. यासाठी २७,००० एकर जमीन संपादित केली जाणार आहे.
हा महामार्ग वर्धा, यवतमाळ, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमधून जाणार आहे.
यामुळे नागपूर ते गोवा सध्याचे १८ तासांचे अंतर केवळ ८ तासांत पार होणार आहे. महत्त्वाची धार्मिक स्थळे जसे की पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट, कोल्हापूरची अंबाबाई आणि कुणकेश्वर मंदिर या महामार्गाने जोडली जातील.