नागपूर – भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूरमध्ये शक्तिप्रदर्शन करीत रोड शो केला. यावेळी त्यांच्या पत्नी अमृता फडणवीसही त्यांच्या समवेत होत्या. रोड शो दरम्यान पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, काँग्रेस व्होट जिहाद करीत आहे. भाजपाला मतदान करणार्यांवर बहिष्कार टाका असे सांगत आहे. त्यांच्या या प्रचाराला आम्ही जोरदार उत्तर दिले आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भाजपाने ‘बटेंगे तो कटेंगे’ असा आक्रमक प्रचार सुरू केला आहे. त्याचे कारण काँग्रेसला आम्हाला उत्तर द्यायचे आहे. काँग्रेसच्या व्होट जिहादला आमचे हे उत्तर आहे. महायुतीच्या काही नेत्यांना ‘बटेंगे तो कटेंगे’चा नेमका अर्थ कळला नाही. त्यामुळे त्यांनी याला विरोध केला. मात्र आता आम्ही त्यांना समजावले आहे.
शरद पवार हे धर्माचे राजकारण करत आहेत. ते मौलाना नोमानी यांच्या पाठीशी आहेत. नोमानी यांनी 17 मागण्या केल्या. हे 17 मागण्यांचे पत्र शरद पवार यांनी घेतले आणि या सर्व मागण्यामान्य केल्या. दंगलीतील मुस्लीम आरोपींना सोडून द्या, ही त्या 17 मागण्यांपैकी एक मागणी होती. ती मागणीही शरद पवारांनी मान्य केली आहे. त्यानंतर नोमानी यांनी फतवा काढला आहे की, आमच्या मागण्या मान्य झाल्या आहेत. आता भाजपा विरोधात मतदान करा. या सर्वाला काय म्हणतात? हे एका समाजाचे तृष्टीकरण नाही का? या भूमिकेमुळे संविधानाचे उल्लंघन होत नाही का?
सोयबीनबाबत काँग्रेस फसवत आहे
नागपूर येथे रोड शो नंतर देवेंद्र फडणवीस यांची चांदवड-देवळा मतदारसंघात प्रचार सभा झाली. यावेळी ते म्हणाले की, पावसाळा लांबल्याने सोयाबीनची आर्द्रता 18 टक्क्यांवर गेली आहे. नियमानुसार 12 टक्क्यांवर आर्द्रता असेल तर सोयाबीन विकत घेता येत नाही. मात्र आम्ही केंद्राला पत्र लिहून महाराष्ट्रातील विशेष परिस्थिती समाजावून सांगितली. शेतकर्यांनाही आम्ही समजावले की, सोयाबीन तसेच ठेवा, काही दिवसांनी त्याची आर्द्रता कमी होऊ लागेल. त्यानुसार आता सोयाबीनची आर्द्रता 15 टक्क्यांवर आली आहे. कालच केंद्र सरकारने आम्हाला पत्र पाठविले की, 15 टक्के आर्द्रता असलेले सोयाबीन 6 हजार रुपये दराने केंद्र सरकार विकत घेईल. यानुसार 400 खरेदी केंद्र सुरू झाली आहेत. काँग्रेस आता सांगते आहे की, ते महाराष्ट्रात सत्तेवर आले तर सोयाबीनला 7000 भाव देतील. मात्र शेजारचे काँग्रेसचे कर्नाटकचे सरकार आता सोयाबीनला 3800 रुपये भाव देत आहे. हे सरकार जर 3800 रुपये भाव देत आहे तर काँग्रेस सरकार महाराष्ट्रात आल्यावर 7000 रुपये भाव कुठून देणार आहे? हे लबाडाचे आवताण आहे.