मॉस्को – नाटो अर्थात उत्तर अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन (नाटो)ने युक्रेनच्या बाजूने उभे राहण्याचे वक्तव्य केल्यामुळे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन संतापले आहेत.त्यांनी पुन्हा एकदा अणुबॉम्बची धमकी दिली आहे.
पुतिन यांनी म्हटले आहे की, आम्हाला खरे तर युक्रेनविरोधातील युद्ध जिंकण्यासाठी अणुबॉम्बचा वापर करण्याची आवश्यकता नाही, पण नाटोला असे वाटत असेल की आम्ही तसे कधीच करणार नाही तर ही त्यांची चुकीची कल्पना आहे. युक्रेनला सैन्य मदत केली जात असेल तर नाटोशी रशियाचा संघर्ष होऊ शकतो आणि युद्धाचे स्वरूप अणुबॉम्बच्या हल्ल्यात होऊ शकते.
दरम्यान,काही दिवसांपूर्वीच मॉस्कोने आपला मित्र बेलारूससोबत अणुहल्ल्याचा सामरिक अभ्यास केला आहे.येत्या काही दिवसांत नाटो युक्रेनमध्ये सैन्य तैनाती आणि रशियाच्या भूमीत छोट्या हल्ल्यांना परवानगी देऊ शकते.याच पार्श्वभूमीवर रशियाने बेलारूससोबत युद्ध अभ्यास केला असल्याचे सांगितले जात आहे.पुतिन यांनी २४ फेब्रुवारी २०२२ मध्ये युक्रेनवर हल्ला केला होता. म्हणजे युद्ध सुरू होऊन आता दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधी उलटला आहे. युक्रेनला साथ देण्यासाठी अमेरिका आणि युरोपच्या अनेक देशांनी पुढाकार घेतला आहे. येत्या काळात या देशांकडून युक्रेनला होणारी मदत वाढू शकते. अशा परिस्थितीत पुतिन हे अणुहल्ल्याची भाषा करत आहेत.