बार्शी-वैराग येथील श्री सच्चिदानंद संतनाथ महाराजांची यात्रा आज गुरुवारपासून धुमधडाक्यात सुरू झाली.पाच दिवस चालणाऱ्या या यात्रेत नारळी पौर्णिमेचा दिवस मुख्य आहे. वैरागची यात्रा पंचक्रोशीत प्रसिध्द असून सोलापूर जिल्ह्यातील भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात.
नारळी पौर्णिमेच्या दिवशी पहाटे सव्वा पाच वाजता मंदिरात धामणगावच्या बोधले वंशजांकडून मंदिरात जोग घेण्याचा विधी होणार आहे.गावातील तसेच पंचक्रोशीतील भाविक भक्त पहाटेपासून संतनाथ महाराजांच्या दर्शनासाठी मंदिरात गर्दी करतात. दुपारी एक वाजता मानकऱ्यांची मिरवणूक निघते. सव्वा एक ते दोनच्या सुमारास मानकरी मंदिरात पोहोचतात.दुपारी दोन वाजता संतनाथ महाराजांची पालखी नगर प्रदक्षिणेसाठी मंदिरातून बाहेर निघते. ही पालखी हिंगणी रोडवरील गाव तळ्याजवळ येताच तेथे दहीहंडी – काल्याचा कार्यक्रम पार पडतो.त्यानंतर दुसर्या दिवशी मंगळवार २० रोजी कुस्ती आखाड्याचे आयोजन केले आहे.