बीड
भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंनी स्थापन केलेल्या परळी तालुक्यातील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदाची निवडणूक बिनविरोध झाली आहे.ज्यात मुंडे भगिनींसह 21 उमेदवार बिनविरोध निवडून आले. या निवडणुकीत कारखान्याच्या माजी चेअरमन आणि भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे एकत्र आल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली.
संचालकपदाच्या 21 जागांसाठी एकूण 50 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेत 50 पैकी 13 उमेदवारांचे अर्ज बाद झाले. या निवडणुकीसाठी मुंडे बहीण- भाऊ एकत्रित आल्यामुळे गुरुवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी या निवडणुकीतून भाजपच्या खासदार प्रीतम मुंडे यांच्यासह 16 जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे शिल्लक राहिलेले 21 उमेदवार बिनविरोध निवडून आले. या निवडणुकीसाठी धनंजय मुंडेंनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला नव्हता. बिनविरोध निवडून आलेल्यांमध्ये पंकजा मुंडे, यशश्री मुंडे, केशवराव माळी, वाल्मिक कराड, श्रीहरी मुंडे, रेशीम कावळे, ज्ञानोबा मुंडे, राजेश गीते, सतीश मुंडे, अजय मुंडे, पांडुरंग फड, हरिभाऊ गुट्टे, सचिन दरक, सुरेश माने, वसंत राठोड, चंद्रकेतू कराड, शिवाजीराव गुट्टे, शिवाजी मोरे, सुधाकर सिनगारे, सत्यभामा उत्तमराव आघाव, मंचक घोबाळे यांचा समावेश आहे.