वैजापूर तालुक्यात मुंबई पोलिसांच्या पथकावर जमावाचा जीवघेणा हल्ला

छत्रपती संभाजीनगर – जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील एका गावात पोलीस भरती घोटाळ्याच्या तपासकामी आलेल्या मुंबई पोलिसांच्या पथकावर जमावाने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे .या पथकाच्या ३० ते ३५ लोकांच्या जमावाने लाठ्या-काठ्यांसह दगडफेक करत संशयित आरोपींच्या अटकेला विरोध केला. तसेच आरोपींनादेखील जमावाने पळवून जायला मदत केली. याप्रकरणी वैजापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबईच्या दहिसर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई विनोद चितळकर यांनी वैजापूर पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, पोलीस भरती प्रकरणाचा तपास करत असताना ते आ गुन्हे प्रकटीकरण पथकासह छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील संजरपुरवाडी येथे जनकसिंह सिसोदे आणि संतोष गुसिंगे या दोन संशयित आरोपींच्या चौकशीसाठी आले होते. यावेळी त्यांच्यासोबत स्थानिक पोलीसदेखील होते. दरम्यान गावात गेल्यावर आरोपींच्या नातेवाईकांनी आरडाओरडा करायला सुरुवात केली. यावेळी ३० ते ३५ लोक लाठ्या-काठ्या आणि कुऱ्हाड घेऊन जमा झाले. या जमावाने पोलिसांना मारहाण करण्यात केली. तसेच जमावातील एकाने कुऱ्हाडीने पोलीस कर्मचारी विनोद चितळकर यांच्या डोक्यावर हल्ला केला. मात्र त्यांनी वेळीच स्वतःचा बचाव करत वार चुकवल्याने मोठा अनर्थ टळला. पण त्यांच्या ओठाला कुऱ्हाडीचा दांडा लागला.
पोलीस पथक आपले ओळखपत्र दाखवत त्यांची समजूत घालत असताना पवन बम्मनावत याने एकाचे ओळखपत्र पाहण्यासाठी घेऊन फेकून दिले. तसेच विठ्ठल गबरु बम्मनावत नावाच्या व्यक्तीने पोलिसांना, माझा मेहुणा रुपसिंग गुसिंगे हा पोलीस असून त्यांना फोन लावून तुम्हाला दाखवतो, असा दम दिला. त्यांनी पोलीस अंमलदार असलेल्या रुपसिंग गुसिंगे यांच्या मोबाईलवर फोन लावला. फोन स्पीकरवर ठेवून विठ्ठल बमनावतने त्याला सांगितले की, सात ते आठ लोक गाडीत असून ते पोलीस असल्याचे सांगत आहेत. तेव्हा फोनवर बोलत असलेल्या गुसिंगेने, गाडीची पासिंग कुठली आहे. गाव गोळा करून गाडी जावू देवू नका, त्यांना सर्व मिळून सरळ करा असे, म्हणून फोन कट केला. पोलीस कर्मचाऱ्यानेच फोनवरून जमावाला चिथावणी दिली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top