मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राबविलेल्या ३३ कोटी वृक्षांची लागवड करण्याच्या महत्त्वाकांक्षी मोहिमेत कोणतीही अनियमितता किंवा गैरव्यवहार झालेला नाही, असा निष्कर्ष या प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमलेल्या तदर्थ समितीने मांडले आहेत. समितीच्या या शिफारशीनुसार सुधीर मुनगंटीवार यांना अखेर ‘क्लीन चीट’ मिळाली आहे. तसेच, या अभियानांतर्गत राज्यभरात तब्बल ५२ कोटी वृक्षांची लागवड झाल्याचेही समितीने म्हटले आहे. मात्र, अशा मोहिमांसाठी लहान रोपटे न लावता, २-३ वर्षांची व ७ ते १० फूट उंचीची झाडे लावण्याची शिफारसही समितीने अहवालात केली आहे.
देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ३३ कोटी वृक्षलागवडीची घोषणा केली होती. यामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला होता. विधानसभेतही त्याचे पडसाद उमटले होते. त्याची गंभीर दखल घेत तत्कालीन वनमंत्री दत्ता भरणे यांनी या वृक्षलागवडीच्या चौकशीसाठी समितीची घोषणा केली होती. या समितीचा अहवाल नुकत्याच संपलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी सभागृहात सादर करण्यात आला. या अभियानाच्या अंमलबजावणीत कोणतीही अनियमितता किंवा गैरव्यवहार झाला नसल्याचा निष्कर्ष या अहवालात मांडण्यात आला आहे.