मुंबई :
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित ‘वीर सावरकर : सिक्रेट फाइल्स’ हिंदी वेबसिरीज प्रदर्शित होत आहे. यामाध्यमातून सावरकर यांचा संपूर्ण जीवनप्रवास उलघडणार आहे. नुकतेच या वेबसिरिजचे पोस्टर आणि टीझर र प्रदर्शित करण्यात आले असून, ‘वीर सावरकर : सिक्रेट फाइल्स’ या वेब सीरिजमध्ये अभिनेता सौरभ गोखले वीर सावरकरांची भूमिका साकारणार आहे.
या वेबसिरीजच्या नवीन पोस्टरने सर्वांचंच लक्ष वेधून घेतले आहे. यात सौरभ काळा कोट आणि काळी पँटमध्ये दिसत आहे. तर त्याच्या मागे एका झेंड्यावर ‘वंदे मातरम’ असे लिहिलेले दिसते. ही वेब सीरिज पुढच्या वर्षी 26 फेब्रुवारीला वीर सावरकरांच्या पुण्यतिथीला प्रदर्शित होणार आहे. या हिंदी वेब सीरिजचे लेखन आणि दिग्दर्शन योगेश सोमण करणार आहेत. तर निर्मिती डॉ. अनिर्बन सरकार करणार आहेत. ही सीरिज तीन भागांमध्ये प्रदर्शित केली जाणार आहे.
‘स्वातंत्र्यवीर सावरकर या व्यक्तिमत्त्वाकडे मागील काही वर्षांपासून दुर्लक्ष झालेले आहे. या वेबसीरिजच्या माध्यमातून ही भूमिका मांडण्याचे काम केले जाणार आहे.आतापर्यंत दुर्लक्षित राहिलेले स्वातंत्र्यवीर प्रेक्षकांसमोर आले पाहिजेत. ही त्यामागची भावना आहे. कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित ही वेबसिरीज नाही,’ असे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी म्हटले आहे.