कोल्हापूर – कोल्हापूर जिल्ह्यात विषबाधेच्या दोन घटनांमध्ये पाच जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. करवीर तालुक्यातील मांडरे आणि कागल तालुक्यातील चिमगाव येथे विषबाधा झाल्याने दोन चिमुकल्यांसह पाच जणांना आपला जीव गमवावा लागला.
मांडरे येथे २० दिवसांपूर्वी मुंगूस चावून दगावलेल्या कोंबडीचे मांस खाल्ल्याने एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. वडील पांडुरंग विठ्ठल पाटील, कृष्णात पाटील आणि रोहित पाटील या दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.तर लहान भाऊ प्रदीप पाटील याची प्रकृती अत्यवस्थ आहे. कौटुंबिक वादातून पत्नी गंगा हिनेच कुटुंबीयांवर विषप्रयोग केला असावा,असा ग्रामस्थांचा संशय आहे. अजून तरी ठोस पुरावा हाती न आल्याने पोलिसांचा तपास सुरू आहे.
मांडरेतील प्रकरण ताजे असतानाच चिमगाव येथे मुदत संपलेला कप केक खाल्लेल्या चिमुकल्या भावंडांचा मृत्यू झाला. एका नातेवाईकाने आणलेल्या कप केकमधून त्यांना ही विषबाधा झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. पोलिसांनी दफन केलेले मुलांचे मृतदेह बाहेर काढून तपासणीसाठी नमुने पाठवले आहेत. दोघांच्या मृत्यूच्या कारणाचे निदान करण्यासाठी व्हिसरा तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.दोन्ही घटनांची गंभीर दखल घेत दोन्ही घटनांत विषबाधेसाठी कारणीभूत ठरलेले अन्न नेमके कुठून आले होते? त्याचे उत्पादन कुठे झाले होते? याची चौकशी सध्या पोलिसांकडून केली जात आहे.