विलेपार्ले फ्लाय ओव्हरवर सहा महिन्यातच खड्डे

मुंबई – देशाच्या अनेक भागात उद्घाटनानंतर पूल कोसळणे, रस्ते उखडणे अशा घटना घडत असतांनाच केवळ सहा महिन्यांपूर्वी उद्घाटन केलेल्या विलेपार्ले उड्डाणपुलावर खड्डे पडले आहेत.विमानतळावर त्याचप्रमाणे बोरीवलीहून शहरात व शहरातून बोरीवलीच्या दिशेने जाणारी वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी पश्चिम द्रुतगती मार्गावर विलेपार्ले येथे उड्डाणपूल बांधण्यात आला. एमएमआरडीएने या पुलाची बांधणी केली. ९ मार्च रोजी सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, मुंबईचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत त्याचे उद्घाटन झाले. याची बांधणी करतांना मुंबईतील पावसाचा व त्यासाठी आवश्यक असलेल्या उताराचा विचार न केल्याने त्यावर आता खड्डे पडले आहेत. या फ्लायओव्हरच्या २०० ते २५० मीटरचा टप्प्यात हे खड्डे पडले असून त्यावरुन वेगाने जाता येत नसल्याने पुलावर वाहतूक कोंडी होत आहे. याबाबत या मार्गाने प्रवास करणाऱ्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. अंधेरी लोखंडवाला ओशिवरा नागरिक मंचाचे संस्थापक धवल शाह यांनी म्हटले की, या पुलासाठी पश्चिम द्रुतगती मार्ग सहा लेन ऐवजी दोन लेनचा झाला. त्यामुळे या भागात वाहतूक कोंडी सुरु झाली. आता पुलावरून जाणे धोकादायक झाल्यामुळे वाहने पुन्हा पुलाखालून जाऊ लागली. त्यामुळे इथे वाहतूक कोंडीचा प्रचंड त्रास होत आहे. या पुलाची तातडीने दुरुस्ती व्हायला तर हवीच, त्याचबरोबर त्या कंत्राटदारावरही कारवाई होणे गरजेचे आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top