मुंबई – मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेने कमाल केली, तर फेक नरेटिव्ह हद्दपार झाले,असे टीकास्त्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांवर डागले.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र व शिवसेना शिंदे गटाचे श्रीकांत शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीच्या विजयानंतर जल्लोष साजरा केला. श्रीकांत शिंदे म्हणाले की,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी ज्या प्रकारे सव्वादोन वर्ष काम केले आहे, न भूतो न भविष्यती असे रेकोर्डतोड निर्णय घेतले, विकास कामे, वेगवेगळ्या योजना महायुती सरकारने आणल्या, समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचण्याचे काम महायुती सरकारच्या माध्यमातून झाले त्याचाच हा विजय आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढली. एकही दिवस सुट्टी न घेता, न थकता सातत्याने जनतेसाठी काम केले, जनतेसाठी निर्णय घेतले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. १८ ते २० तास काम करणारे मुख्यमंत्री महाराष्ट्रात झालेले यापूर्वी झालेले नाहीत.
ते पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री शिंदे आणि महायुती सरकारने जनतेसाठी घेतलेल्या निर्णयामुळे ते जनतेपर्यंत पोहचले. वर्षा निवासस्थान सामन्यांसाठी खुले केले. राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेने कमाल केली. लाडक्या बहिणींना त्यांनी सक्षम करण्याचा प्रयत्न केला, त्या बहिणी पूर्ण ताकतीने त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या. तसेच शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या माध्यमातून सरकार ५ कोटी जनतेपर्यंत पोहचले. जनतेने विकासाला प्राधान्य देत, फेक नरेटिव्हला हद्दपार केले आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार कोण पुढे घेऊन जात आहे याचे उत्तर जनतेने आज दिले आहे. बाळासाहेबांची शिवसेना पुढे घेऊन जाण्याचे काम शिवसैनिक करत आहेत.शिवसेना प्रा.लिमिटेड किंवा कोणाची वैयक्तिक मक्तेदारी नाही.