न्यूयॉर्क - अमेरिकेतील फिलाडेल्फियामध्ये पुन्हा एक विमान अपघात झाला. सहा मेक्सिकन नागरिकांना घेऊन जाणारे विमान घरांवर कोसळले आणि स्फोट झाला. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला, तर १९ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये विमानातील सहा मेक्सिकन नागरिक आणि जमिनीवरील एका व्यक्तीचा समावेश आहे.
अपघात ईशान्य फिलाडेल्फिया विमानतळापासून ५ किलोमीटर अंतरावर झाला. हे विमानतळ प्रामुख्याने व्यावसायिक जेट आणि चार्टर उड्डाणे हाताळते. विमान घरे आणि गाड्यांवर कोसळल्याने आग लागली. विमानाने स्थानिक वेळेनुसार शुक्रवारी संध्याकाळी ६ वाजता उड्डाण केले. उड्डाणानंतर काही सेकंदातच ते रडारवरून गायब झाले. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, फिलाडेल्फियाच्या महापौर चेरिल पार्कर यांनी या अपघातात १९ जण जखमी झाल्याचे सांगितले.जखमींची स्थिती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे