मुंबई- निवडणुकांची मतमोजणी झाली की उमेदवाराचे डिपॉझिट जप्त झाले असे अनेकदा ऐकायला मिळते. प्रत्येक निवडणुकीसाठी वेगवेगळे डिपॉझिट असते. त्याप्रमाणे यंदाची विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला सर्वसाधारण वर्गासाठी १० हजार रुपये तर राखीव उमेदवारांसाठी ५ हजार रुपये डिपॉझिट निश्चित करण्यात आले आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करायला आजपासून सुरुवात झाली असून अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस २९ ऑक्टोबर आहे. निवडणूक आयोगाने विधानसभा मतदारसंघानुसार निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालये स्थापन केली आहेत. या ठिकाणी एक खिडकी पद्धतीने अर्ज भरण्याची व्यवस्था केली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्रांची छाननी ३० ऑक्टोबर रोजी होणार असून अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ४ नोव्हेंबर आहे. २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून २३ नोव्हेंबरला मतमोजणी होईल.