विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करणार! जरांगेंची मोठी घोषणा

जालना – विधानसभा निवडणुकीत काही ठिकाणी उमेदवार उभे करणार आणि काही ठिकाणी उमेदवार पाडणार अशी घोषणा मराठा आंदोलक मनोज जरांगे- पाटील यांनी केली आहे. जिथे निवडून येऊ शकतील तिथे अपक्ष उमेदवार उभा करावा, ज्या ठिकाणी निवडून येऊ शकणार नाहीत तिथे जो आपल्याला आपल्या मागण्या पूर्ण करण्याबाबत बाँडवर लिहून देतील त्याला निवडून द्यायचे अन्यथा पाडायचे असे
जरांगे म्हणाले.
मनोज जरांगे-पाटील यांनी आज अंतरवाली सराटीमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाची महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीला हजारोंच्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते. मनोज जरांगे-पाटील निवडणुकीबाबत काय निर्णय घेणार? उमेदवार उभे करणार की पाडणार याबाबत सर्वांनाच मोठी उत्सुकता होती. या बैठकीकडे राज्याचे लक्ष लागले होते.
जरांगे-पाटील म्हणाले की, महायुती आणि महाविकास आघाडी हे दोघेही चाबरे आहेत. त्यांच्या याद्या दिल्लीत पडून आहेत. आम्ही काय निर्णय घेतो याची हे वाट पाहत आहेत. प्रत्येक मतदारसंघात आपले एक लाखाचे मतदान आहे. एक लाखाची लीड तुटत नाही. यश-अपयश प्रत्येक बाबतीत असते. आपण विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार दिले तर भाजपा खूश होईल. उमेदवार दिले नाही तर महाविकास आघाडीला आनंद होईल. मात्र मराठा आरक्षणाबाबत दोघेही काही स्पष्ट बोललेले नाहीत. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये जिथे मराठा समाजाचा उमेदवार विजयी होण्याची शक्यता असेल तिथे आपण आपला उमेदवार देऊ, एस्सी आणि एसटी उमेदवारांच्या विरोधात उमेदवार देऊ नका. जिथे आपला उमेदवार नाही तिथे जो आपल्या विचाराचा उमेदवार असेल त्याला लाखभर अधिक मते देऊन निवडून आणा. मात्र, त्या उमेदवाराकडून 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर आपल्याला पाठिंबा देईल असे लिहून घ्यायचे. जे लिहून देणार नाही त्यांना पाडा. कोणत्या मतदारसंघामधून आपण निवडणूक लढवायची आणि कोणत्या मतदारसंघात पाडायचे हे येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये सांगतो. तुम्ही सगळ्या मतदारसंघात अर्ज भरून ठेवा. कुठे मराठ्यांची ताकद आहे, कुठे मुस्लिमांची ताकद आहे ते गणित पाहणे गरजेचे आहे. कारण ते समीकरण जुळवणे देखील महत्त्वाचे आहे. मी समीकरण जुळवतो आहे. पण ऐनवेळी ज्या उमेदवाराला अर्ज मागे घ्यायला सांगितला जाईल त्याने आपला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top