विदर्भ वगळता राज्यात कोरडे वातावरण
राहणार; हवामान खात्याचा अंदाज

मुंबई – मुंबईसह कोकण आणि महाराष्ट्रातील उर्वरित भागात उन्हाचा दाह पुन्हा वाढू लागला आहे. विदर्भ वगळता महाराष्ट्रातील उर्वरित भागात कोरडे हवामान राहणार आहे. कोकण किनारपट्टी भागात उष्ण वारे वाहणार आहेत, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला. तर, सातारा, पुणे, कोल्हापूर भागातही हवामान कोरडे राहून आकाश निरभ्र राहील, असे हवामान खात्याने स्पष्ट केले.

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, भारताच्या उत्तर पश्चिम भागातील बहुतांश ठिकाणांवर पाऊस आणि गारपीटीची शक्यता आहे. पुढील दोन दिवसांत जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमधील काही भागात जोरदार ते मध्यम स्वरुपात पावसाची हजेरी लागू शकते. यादरम्यान, ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहणार आहेत. सध्या हिमाचल प्रदेशच्या दिशेने जाणाऱ्या पर्यटकांचा आकडा मोठा आहे. त्यामुळे या भागात हवामान विभागाकडून पाऊस आणि गारपीटीच्या पार्श्ववभूमीवर यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या ठिकाणी सकाळच्या वेळी वातावरणामध्ये फारसे बदल अपेक्षित नसले तरीही दुपारनंतर अनेक भागांमध्ये पाऊस पडू शकतो. त्यामुळे घराबाहेर निघताना नागरिकांनी तापमानाचा अंदाज घ्यावा असेही हवामान खात्याने सांगितले आहे.

Scroll to Top