नागपूर – विदर्भातील वनपरिक्षेत्रात जानेवारी महिन्याच्या १० दिवसांतच पाच वाघांचे मृत्यू झाले. तर दोन वाघ बेपत्ता असल्याचे वनविभागाच्या निदर्शनास आले. या पार्श्वभूमीवर आता वनविभाग सतर्क झाला आहे.
मृत्यू झालेल्या वाघांमध्ये सहा महिन्यांच्या दोन बछड्यांसह तीन प्रौढ वाघांचा समावेश आहे. या वाघांचे संशयास्पद मृत्यू अभयारण्य व व्याघ्र प्रकल्पाबाहेर झाले आहेत. तसेच, यवतमाळ येथे सापडलेल्या मृत वाघांची दात आणि नखे गायब आहेत, तर भंडारा येथे वाघाच्या मृतदेहाऐवजी त्याचे तुकडे सापडले आहेत.याशिवाय, यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यातील ‘तलाववाली’ वाघीण आणि ‘जंजीर’ वाघ पर्यटन हंगामापासून दिसलेले नाहीत. या दोघांच्या पाऊलखुणा किंवा हालचाली वनविभाग व पर्यटकांना आढळलेल्या नाहीत. पावसाळ्यापूर्वी त्यांचा वावर अभारण्यात होता, मात्र आता ते बेपत्ता झालेले आहेत.
२ जानेवारीला चंद्रपूरच्या सिंदेवाही वनपरिक्षेत्रात एका वाघाचा संशयास्पद मृतदेह आढळला. ६ जानेवारीला भंडाराच्या तुमसर वनपरिक्षेत्रात मृतदेहाचे तीन तुकडे आढळले. ७ जानेवारीला यवतमाळच्या उकणी येथे वाघाचा अर्धवट कुजलेला मृतदेह आढळला आणि त्याचे दोन दात आणि १२ नखे गायब होती. ८ जानेवारीला नागपूरच्या पेंच व्याघ्रप्रकल्प वनविभागात एका बछड्याचा मृतदेह सापडला. हा मृत्यू उपासमारीने झाल्याचे म्हटले जात आहे. याव्यतिरिक्त चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील मूल बफर क्षेत्रात एका बछड्याचा मृतदेह सापडला. त्यालामोठ्या वाघाने हल्ला करून मारल्याचा संशय वनविभागाने व्यक्त केला.