मुंबई – राज्यातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून बदल झाल्याने अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला होता. मात्र त्यानंतर वातावरण स्थिर पहायला मिळाले. आज राज्यात उन्हाचा तडाखा २ ते ४ अंशाने वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला. तसेच ७,८,९ एप्रिल रोजी राज्यातील काही जिल्ह्यांत वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यात विदर्भ, मराठवाड्यात अनेक शेतकऱ्यांचा अजून गहू काढणे बाकी आहे. तसेच हळद, मका, कांदा काढणी चालू आहे. शेतकऱ्यांनी ५ एप्रिलच्या आत गहू, मका, कांदा काढून घेणे गरजेचे असल्याचे मत हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी व्यक्त केले. याबरोबरच कोकणातील आंबा शेतकऱ्यांनी देखील ७, ८, ९ एप्रिल दरम्यान काळजी घ्यावी असे डख यांनी सांगितले आहे. दरम्यान, राज्यात ७, ८, ९ एप्रिल दरम्यान विदर्भ व मराठवाडा विभागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामध्ये अहमदनगर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, बीड, परभणी, संभाजीनगर, जळगाव, बुलडाणा, यवतमाळ, नांदेड, जालना, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर या जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला आहे. यानंतर सहा सात दिवस हवामान कोरडे राहील व नंतर पुन्हा १४, १५, १६ एप्रिल रोजी पावसाची शक्यता सांगण्यात आली आहे.