मुंबई – मुंबईच्या विक्रोळी परिसरात काल रात्रीच्या सुमारास घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. स्फोटामुळे घराला आग लागली. या आगीत दोन व्यक्ती ९० टक्के भाजले आहेत. त्यांना खासजी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. धनंजय मिश्रा आणि राधेश्याम पांडे असे जखमी व्यक्तींची नावे आहेत.
मुंबईच्या विक्रोळी पार्कसाइट येथील श्रीराम सोसायटीमध्ये ही घटना घडली. धनंजय मिश्रा आणि राधेश्याम पांडे हे आपल्या कुटुंबासहित सोसायटीत राहत होते. शनिवारी रात्रीच्या सुमारास जेवण करून ते झोपायला गेले. त्यावेळी स्वयंपाकघरात असलेल्या घरगुती गँस सिलिंडरचा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता, की संपूर्ण सोसायटीला हादरे बसले. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. इमारतीमधील रहिवाशांना तातडीने बाहेर काढण्यात आले. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. आगीत जखमी झालेल्या व्यक्तींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आगीमुळे घरातील संसार उपयोगी वस्तू जळून खाक झाल्या आहेत.