मुंबई -पंजाब नॅशनल बँक (पीएनबी)ची साडे अकरा हजार कोटी रुपयांची फसवणूक करून देशाबाहेर पळून गेलेला हिरे व्यापारी नीरव मोदीचे मुंबईच्या वरळी येथील ‘समुद्र महल’ इमारतीतील ३ आलिशान फ्लॅट्स ईडीसाठी चांगलीच डोकेदुखी ठरत आहेत. या फ्लॅट्सचा लिलाव होण्याची शक्यता कमी आहे. कायदेशीर अडचणींमुळे त्यांना ११० कोटी रुपये अपेक्षित किंमत मिळण्याची शक्यता नाही. दुसऱ्या बाजूला, देखभालीचा खर्च खूप मोठा असल्याने ते आपल्या ताब्यात ठेवणेही ईडीसाठी अवघड ठरतेय.
नीरव मोदी फरार झाल्यापासून या घरांना टाळे लागलेले आहे. ईडीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ‘या फ्लॅट्समधील महागड्या वस्तू आणि भिंतीवरील पेंटिंगच्या देखभालीचा खर्च मोठा आहे. तो पंचतारांकित हॉटेलच्या भाड्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळे कोणताही अधिकारी या फ्लॅट्सच्यास देखरेखीची जबाबदारी घ्यायला तयार होणार नाही.’
अमली पदार्थांचा तस्कर इक्बाल मिर्चीचे जवळच्याच ‘सीजे हाऊस कॉम्प्लेक्स’मध्येघर गेस्टहाऊसमध्ये रूपांतरित करण्यात आले होते. त्याप्रमाणे नीरव मोदींचे फ्लॅट्स एकत्र करून त्यांचे गेस्टहाऊस करण्याचा विचार पुढे आला होता. इकबालच्या घरात आता दोन कार्यालये थाटण्यात आली आहेत. नीरव मोदींची घरांतील सामान अतिशय महागडे आहे. त्यांची नेमकी किंमत ईडी अधिकाऱ्यांनाही ठाऊक नाही. गेस्टहाऊस बनवण्यासाठी हे मौल्यवान सामान हलवावे लागेल. तसे करताना ते तुटल्यास नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.`
कर्जाच्या वसुलीसाठी ‘पीएनबी’ने मोदीच्या १८ कोटी रुपये किमतीचे दोन फ्लॅट लिलावाच्या माध्यमातून विकण्याचा प्रयत्न केला. ३ फेब्रुवारी रोजी लिलाव पार पडला. मात्र लिलावाची ही प्रक्रिया निष्फळ ठरली. कारण या प्रॉपर्टी विकत घेण्यासाठी कोणीही रस दाखवला नाही. कर्जवसुली न्यायाधिकरणचे अधिकारी आशू कुमार यांनी नीरव मोदी याच्या दोन मालमत्तांची किंमत कमी करून त्यांचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे.