नाशिक
पुणे-नाशिक महामार्गावर गुरुवारी एक बिबट्या मृतावस्थेत आढळला. हा बिबट्या पाच ते सहा वर्षांचा असल्याचे सांगण्यात येते. पहाटेच्या वेळी रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाची बिबट्या धडक बसली. या धडकेत डोक्याला गंभीर मार बसल्याने त्याचा मृत्यू झाला, असा अंदाज वनविभागाने वर्तवला आहे.
नारायणगाव येथे मीना शाखा कालव्यालगत मुक्ताई ढाब्याजवळ दिलीप पाटे यांचे घर व शेती आहे. गुरुवारी पहाटे ५ च्या सुमारास पाळीव कुत्र्याचा भूंकण्याचा आवाज ऐकून पाटे बाहेर आले. त्यावेळी त्यांना महामार्गावर बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला. याबाबतची माहिती त्यांनी पोलिस ठाणे व वनविभागाला दिली. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी महामार्गाच्या मध्यभागी मृतावस्थेत पडलेल्या बिबट्याला उचलून रस्त्याच्या कडेला आणले. त्यानंतर पोलिस आदिनाथ लोखंडे, वनरक्षक रामेश्वर फुलवाड यांनी मृत बिबट्याला माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात नेले.