वाशिम:- हळदीला योग्य भाव मिळत नसल्याने आज शेतकऱ्यांनी नांदेड अकोला महामार्ग रोखून धरला . आज सकाळी हळदीच्या विक्रीसाठीचे सौदे सुरू झाले तेव्हा हळदीला प्रति क्विंटल ४ हजार २०० ते ५ हजार ५०० रुपये इतका भाव मिळाला. या दरम्यान ४०० ते ५०० हळद पोत्यांची विक्रीही झाली. त्यानंतर मात्र हिंगोली बाजार प्रमाणे ७ ते ८ हजाराचा भाव मिळाला पाहिजे या मागणीवरून शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत सौदे बंद पाडले. जय जवान जय किसान अशा घोषणा देत योग्य दर जाहीर केला जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार अशी भूमिका घेत शेतक-यांनी महामार्गावर ठिय्या मांडला.
मागील काही दिवसांपासून हळदीच्या हंगामाला सुरवात झाली आहे. त्यामुळे बाजार समितीमध्ये आवकही वाढलेली आहे. अवकाळी पाऊस आणि गारपीट या नैसर्गिक संकटावर मात केल्याने हे पीक शेतकऱ्यांच्या पदरी पडले होते. चांगला भाव येईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांची होती. सध्या राज्यभरातील बाजार समित्यांमध्ये ७ ते ८ हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे. हिंगोली, रसोड बाजारसमितीमध्ये हळदीला ७ हजार ते ८ हजार रुपयांचा भाव मिळत आहे. मात्र, वाशिम बाजार समितीमध्ये कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी जोरदार निदर्शने केली .