सांगोला – राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस पडून जोरदार वारे वाहत आहे. सांगोल्यामध्ये वावटळीत झोळी उडून दीड वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. जवळा येथील लेंडी ओढ्यात ही घटना घडली आहे. कस्तुरा साधू चव्हाण असे मृत मुलीचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे. 27 एप्रिलला दुपारी अडीच वाजताच्या सुमारास साधू अण्णा चव्हाण हे पत्नी आणि चिमुकल्या कस्तुराला सोबत घेऊन जवळा इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आले होते. उपचार झाल्यानंतर पती-पत्नी, मुलगी आजोबांच्या पालावर आले होते. चिमुकलीचे आजोबा रमेश भीमा निंबाळकर हे जवळा घरेडी रस्त्यावर लेंडी ओढ्याच्या पटांगणात राहतात. बाहेर उन्हाचा तडाखा असल्याने सगळेच पालात विश्रांती घेत होते. मुलगी कस्तुरा पालातच झोळीमध्ये झोपली होती. दुपारी अडीचच्या सुमारास अचानक वावटळ उठली. पालासह झोळी उंच हवेत उडून खाली पडल्याने कस्तुराच्या डोक्याला गंभीर जखम झाली. तिला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
वावटळीमुळे झोळी उडाली! अडीच वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू
