मुंबई- बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख आणि परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी न्याय मिळावा यासाठी गेले काही दिवस राज्यभरात जनआक्रोश मोर्चे काढले जात आहेत. आज मराठा क्रांती मोर्चाने मुंबईत मोर्चा काढला. मात्र, या मोर्चात जितेंद्र आव्हाड व्यतिरिक्त एकही बडा नेता उपस्थित राहिला नाही. मुंबईत मोर्चा असूनही उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे, राज ठाकरे, अमित ठाकरे सतत मुंबईत पत्रकार परिषदा घेणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे नेते का सहभागी झाले नाहीत, असा संतप्त सवाल कार्यकर्ते विचारत होते. या नेत्यांच्या अनुपस्थितीमुळे मोर्चाचा अपेक्षित प्रभाव पडला नाही.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड, शिवसंग्रामच्या नेत्या ज्योती मेटे, उबाठाच्या अयोध््रुया पौळ या दुसऱ्या-तिसऱ्या फळीतील नेत्यांव्यतिरिक्त एकही मोठा नेता आला नाही. या प्रकरणात सातत्याने आवाज उठवणारे भाजपाचे आमदार सुरेश धसदेखील या मोर्चाला उशिरा पोहोचले. तोपर्यंत मोर्चाचा समारोप झाला होता. इतकेच नव्हे तर सरकारकडून आंदोलन करणाऱ्यांना चर्चेसाठी बोलावलेही नाही. सरकारनेही मोर्चाकडे पूर्ण दुर्लक्ष केले.
संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणावरून राज्यभर सत्ताधाऱ्यांविरोधात रान उठवत असताना मुंबईतील नेत्यांनी या मोर्चाकडे गांभीर्याने पाहिले नाही ही खेदाची बाब आहे.
मराठा क्रांती मोर्चा आणि बहुजन समाजाच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला होता. सकाळी मुंबईतील मेट्रो सिनेमापासून या मोर्चाला सुरुवात झाली. संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख आणि भाऊ धनंजय देशमुख या मोर्चाला उपस्थित होते. आझाद मैदानातील जाहीर सभेत या मोर्चाची सांगता झाली. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय द्या, दादागिरी चालणार नाही, अशी घोषणाबाजी आंदोलकांनी केली. अभिनेता सैफ अली खानवरील हल्ला करणाऱ्या आरोपीला लागलीच पकडले जाते. पण संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. त्याला राजाश्रय मिळत असल्याचा आरोप मोर्चेकऱ्यांनी केला. आझाद मैदानातील सभेत बोलताना आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले की, लढाई गर्दी नाही तर दर्दी लढत असतात. गर्दीवर काही अवलंबून नसते. धनंजय मुंडे यांना सत्तेत ठेवून तुम्ही कराडची चौकशी करत आहात, असे कसे चालेल? वाल्मिक कराडला सगळे का घाबरतात? त्याच्याकडे काही कुणाचे व्हिडिओ आहेत का? त्याच्या विरोधात कोणी बोलत नाही. कराडचे पोलीस मित्र अजूनही बीडमध्येच आहेत. त्यांची बदली का होत नाही? वंजारी समाजाचे मागच्या पाच वर्षांत 40 जण आयपीएस अधिकारी झाले. ही वंजारी समाजाची ताकद आहे. वंजारी समाजाचे लोक कष्टाळू आहेत. पण दोन-चार लोकांनी वंजारी समाजाची वाट लावली. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईने 10 लाख रुपये सरकारला परत पाठवले. तिने पैसे घेतले नाहीत. तिने सांगितले की, पैसे नकोत, माझ्या मुलाला न्याय द्या. सोमनाथ सूर्यवंशी मेला कसा? त्याच्या मृत्यूचे कारण सांगा? त्याच्या मृत्यूचे ठिकाण कुठे आहे ते सांगा. पण हे सर्व कुणीही सांगायला तयार नाही. अक्षय शिंदे याची निर्घृण हत्या केली. अक्षय शिंदे याने बलात्कार केलाच नाही. ज्यांनी बलात्कार केला तो लपवण्यासाठी यांनी अक्षय शिंदेची हत्या केली. अक्षय शिंदे प्रकरणात अद्याप पोलिसांवर गुन्हा दाखल झाला नाही. मागच्या तीन वर्षांत या सत्ताधाऱ्यांनी पोलीस खात्याची बदनामी केली. पोलिसांच्या कामात सरकार हस्तक्षेप करत आहे.
संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख म्हणाली की, ज्यांनी माझ्या वडिलांची हत्या केली त्या आरोपींची तुम्ही जात का पाहत आहात? काही लोक जातीयवाद करत आहेत. त्यांना माझी विनंती आहे की, त्यांची जात पाहू नका. आरोपी गुंड आहेत. आज या प्रकरणातील आरोपींना थोडे काही दुखले की, थेट आयसीयूमध्ये दाखल केले जाते. पण माझ्या वडिलांना जेव्हा हाल हाल करून मारले तेव्हा त्यांना किती वेदना झाल्या असतील? त्यांना कोणी उपचारासाठी दवाखान्यातही घेऊन गेले नाही. आरोपींना शिक्षा झाली पाहिजे, ही माझी मागणी आहे.
शिवसंग्रामच्या ज्योती मेटे म्हणाल्या की, संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येला जे कोणी कारणीभूत आहते त्यांना शिक्षा झाली पाहिजे. याला कोणीही जातीय रंग देऊ नका. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी अद्याप फरार आहे. तुम्ही त्याला अटक करू शकत नाही, याचा काय अर्थ आहे? तपास यंत्रणा आणि पोलीस चौकशीत कमी पडत आहेत.
मराठा समाजाचे समन्वयक संजय भोर पाटील म्हणाले की, लोकांकडून पुरावे दिले जातात, तेव्हा तपास यंत्रणेला त्या प्रकरणात माहिती मिळते. त्याआधी त्याच्याकडे कोणतेच पुरावे नसतात. तपास यंत्रणा अशा प्रकारे काम करत असतील तर जनतेचा यांच्यावर विश्वास बसणार नाही. वाल्मिक कराडला वाचवता येत नाही, ही यांची सर्वात मोठी अडचण आहे. येणाऱ्या काही दिवसांत मंत्री धनंजय मुंडेंच्या घरापासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरापर्यंत आम्ही मोर्चा काढणार आहोत. धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला पाहिजे. तोपर्यंत तपास पूर्ण होऊ शकत नाही.
मोर्चात उशिरा पोहोचलेले भाजपा आमदार सुरेश धस यांना मुंबईतील एकही मोठा नेता या मोर्चात सहभागी का झाला नाही याबाबत प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले की, मी 7 तासांचा प्रवास करून आलो. मी मुंबईत आलो तोपर्यंत मोर्चा पुढे निघून गेला होता. काही वेळेस मोर्चात कमी लोक येतात. संख्या पाहू नका. माणसे कमी असली तरी या प्रकरणात समाजाची भावना महत्त्वाची असते. आयोजकांच्या काही चुका झाल्या असतील. आज रेल्वेचा मेगाब्लॉक असल्यामुळेही काही लोक येऊ शकले नाहीत.
कराडचे वैद्यकीय अहवाल सार्वजनिक
करण्याची अंजली दमानियांची मागणी
बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून व खंडणी मागण्याच्या प्रकरणात अटकेत असलेला वाल्मिक कराडचे रुग्णालयात दाखल होणे संशयास्पद असून त्याचे वैद्यकीय अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे. वाल्मिक कराड जीवे मारण्याची धमकी देतांना, खंडणी मागतांना अगदी ठणठणीत होता. आता अटकेत आल्याबरोबरच त्याला उपचाराची गरज भासली. त्याची निष्पक्ष डॉक्टरांकडून तपासणी करुन त्याची रवानगी आर्थर रोड तुरुंगात करावी असेही त्या म्हणाल्या.
आपल्या एक्स या समाजमाध्यमावर प्रसारित केलेल्या व्हिडीओ संदेशात अंजली दमानिया यांनी म्हटले आहे की, कोणत्याही गुन्हेगारासाठी पळण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे रुग्णालय आहे. त्यांना आयसीयूत दाखल केलेले आहे. त्या ठिकाणी ते व्यवस्थित बसलेले दिसत आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारचे मॉनिटरही जोडलेले नाहीत. त्यांचे सर्व रिपोर्ट सार्वजनिक करावेत. त्यांची दोन खाजगी जे कोणत्याही रुग्णालयाशी संबंधित नसलेल्या डॉक्टरांकडून तपासणी करुन घ्यावी. संभाजी नगर किंवा बीड वरुन या डॉक्टरांना पाठवता येईल. ज्या क्षणी ते व्यवस्थित असल्याचे आढळले की लागलीच त्यांची रवानगी मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये करावी. मला खात्री आहे की त्यांना काहीही झालेले नाही. त्यांची तब्येत अगदी ठणठणीत आहे.
वाल्मिक कराड विरोधात मुंबईत मोर्चा धडकला! ठाकरे बंधू, आदित्य, पटोले फिरकलेही नाहीत
