वाल्मिक कराड नियोजन करून पुण्यात शरण! फडणवीसांचा दणका! धनंजय मुंडेंचे मंत्रिपद वाचले

पुणे- बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सूत्रधार असल्याचा ज्याच्यावर संशय आहे तो वाल्मिक कराड आज 22 दिवसांनी गाडीत बसून सीआयडी कार्यालयात स्वतः आला आणि सीआयडीसमोर शरण आला. कराडशी निकटचे संबंध आहेत म्हणून धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावरून हटवा या मागणीला प्रचंड जोर आलेला असतानाच धनंजय मुंडे काल देवेंद्र फडणवीस यांना भेटले. त्यावेळीच फडणवीस यांनी कठोर भूमिका घेत कराडने शरण आलेच पाहिजे असे स्पष्ट केले. आपले मंत्रिपद वाचविण्याचा हा शेवटचा उपाय आहे हे धनंजय मुंडे यांच्या लक्षात आले आणि म्हणून फडणवीस भेटीनंतर 24 तास उलटत नाहीत तोवर कराड शरण येण्याचे नाट्य घडविण्यात आले. कराड हा फक्त खंडणीच्या गुन्ह्यात आरोपी आहे. सरपंच हत्येच्या गुन्ह्यांत त्याचे नाव नाही हेही विशेष आहे.
प्रमुख संशयित असलेला अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड आज अखेर 22 दिवसांनी पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरण आला. आज सकाळी त्याने एक व्हिडिओ पोस्ट करून आपण सीआयडीला शरण येत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर काही क्षणात तो आपल्या गाडीने सीआयडी कार्यालयात पोहोचला. धक्कादायक बाब म्हणजे, वाल्मिक कराड गेले काही दिवस पुण्यातच असल्याचे त्याच्याबरोबर असलेल्यांनी सांगितले. तरीही त्याच्या तपासासाठी स्थापन केलेल्या सीआयडीच्या नऊ टीमना त्याचा पत्ता लागला नाही. काल धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्यावर आज तो अचानक सीआयडीसमोर उपस्थित झाल्याने या सगळ्यांबद्दल संशय निर्माण झाला. इतके दिवस पोलिसांना हुलकावणी देणाऱ्या वाल्मिकला पोलिसांपुढे हजर व्हायला लावले. सर्व सेटिंग करूनच तो पोलिसांसमोर आला, असा आरोप विरोधकांनी केला. त्यामुळे वाल्मिक कराड पोलिसांसमोर हजर झाला तरी या प्रकरणावरून आरोप सुरू आहेत.
वाल्मिक कराड कालच पोलिसांना शरण आल्याची बातमी आली होती. ती खोटी ठरली होती. परंतु या बातमीचा आधार घेऊन वाल्मिक कराड लवकरच शरण येणार, हे सांगितले जात होते. तो पुण्यातच असल्याचेही म्हटले जात होते. तरीही सीआयडीला तो सापडत नसल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असतानाच आज सकाळी वाल्मिकने एक व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओत तो म्हणाला की, माझ्याविरोधात बीडच्या केज पोलीस ठाण्यात खंडणीची खोटी फिर्याद दाखल केली आहे. मला अटकपूर्व जामिनाचा अधिकार असताना मी सीआयडी ऑफिस, पाषाण रोड पुणे येथे सरेंडर होत आहे. संतोष देशमुख यांचे मारेकरी जे कुणी असतील त्यांना अटक करून फाशीची शिक्षा दिली जावी. राजकीय द्वेषापोटी माझे नाव या प्रकरणाशी जोडले जात आहे. पोलीस तपासाच्या निष्कर्षात मी दोषी आढळलो तर मी न्यायदेवता देईल ती शिक्षा भोगण्यास तयार आहे.
हा व्हिडिओ येताच काही मिनिटात दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास वाल्मिक कराड बीडची नंबर प्लेट असलेल्या आपल्या पांढऱ्या स्कॉर्पिओमधून सीआयडी कार्यालयात हजर झाला. त्याच्याबरोबर एक समर्थक नगरसेवक आणि एक कार्यकर्ताही होता. या कार्यकर्त्याने सांगितले की, आम्ही अक्कलकोट येथून देवदर्शन करून आलो आहोत. तर मुंडे नावाचा नगरसेवक म्हणाला की, वाल्मिक कराड आणि आम्ही तीन दिवसांपासून पुण्यातच होतो. वाल्मिक कराडवर खोटे आरोप करण्यात आले आहेत. ते आज स्वतःहून हजर झाले आहेत. खोट्या आरोपांमुळे ते घाबरले असतील. म्हणून ते पोलिसांसमोर आले नाहीत.
वाल्मिक कराडने शरणागती पत्करताच सीआयडीने चौकशी सुरू केली. त्याच्यावर केवळ खंडणीचा गुन्हा दाखल आहे. त्याच्यावर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी अजून तरी गुन्हा नाही. त्यामुळे नेमकी चौकशी कसली झाली, हे सांगण्यात आले नाही. चार तास चौकशी केल्यानंतर संध्याकाळी चार वाजता त्याला गाडीने केजला कोर्टात उभे करण्यासाठी घेऊन गेले.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील विष्णू चाटे, जयराम चाटे, प्रतिक घुले, महेश केदारे या चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तर सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे तीन आरोपी फरार आहेत. मात्र, बीडमधील धनंजय मुंडेंचा उजवा हात असलेला वाल्मिक कराड हाच या प्रकरणाचा प्रमुख सूत्रधार असल्याचा आरोप सुरुवातीपासून होत आहे. या प्रकरणाची तक्रार दाखल झाल्यावर दोन दिवसांनी वाल्मिक कराडवर दोन कोटींच्या खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता, तेव्हापासून वाल्मिक फरार झाला होता. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपशील जसजसा बाहेर येऊ लागला तशी त्याच्यावर गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्याची मागणी होऊ लागली. विरोधी नेत्यांबरोबर भाजपाचे आष्टीचे आमदार सुरेश धस यांनीही ती लावून धरली. या प्रकरणी बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा निघाला. इतरही ठिकाणी आंदोलने झाली. या प्रकरणामुळे महाराष्ट्रातले वातावरण चांगलेच तापले. धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याने त्यांच्याही राजीनाम्याची मागणी होऊ लागली. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचे राजकीय पाठबळ असल्यानेच त्याला इतके दिवस अटक होत नसल्याचाही आरोप झाला. या निमित्ताने बीडमधील गुंडशाही आणि खंडणीगिरी यावरही प्रकाश पडू लागला. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी यावर भाष्य करणे टाळले होते. परंतु दबाव वाढत होता. त्यामुळे वाल्मिक कराड आज सीआयडीला शरण आला.
याप्रकरणी सर्वप्रथम आवाज उठवणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी आज मुख्यमंत्री फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेतली. त्यानंतर ते म्हणाले की, वाल्मिक कराडवर सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा गुन्हा दाखल करावा. कराडने खंडणीच्या गुन्ह्यात आत्मसमर्पण केले आहे. खंडणीचा गुन्हा व संतोष देशमुख यांच्या खुनाचा एकमेकांशी संबंध आहे. त्यांचा देशमुख हत्याकांडाशी संबंध नव्हता तर ते एवढे दिवस फरार का होते? या प्रकरणी आरोपींचा सीडीआर तपासून वाल्मिक कराडवर 302 चा गुन्हा दाखल करावा. दोषीवर कठोर कारवाई होणार असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.
या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर थेट आरोप करणारे आष्टीचे भाजपा आमदार सुरेश धस म्हणाले की, संपत्ती जप्त केल्यानंतर माणूस किती दिवस पळणार? म्हणून कराड शरण आले आहेत. तपास यंत्रणा या प्रकरणाची चौकशी करतील. संतोष देशमुख हत्या प्रकरणी ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती व्हावी, असे पत्र मी मुख्यमंत्र्यांना दिले आहे. याबाबत उद्या सकाळी पुन्हा मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. धनंजय मुंडे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा की नाही, हा अजित पवार यांचा प्रश्न आहे. मी त्याबद्दल बोलणार नाही. तसेच बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी विशेष बाब म्हणून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडचे पालकमंत्री व्हावे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील म्हणाले की, कोण शरण आले आणि कोण नाही, याच्याशी आम्हाला काही देणेघेणे नाही. आमच्या भावाची हत्या झाली. त्यातील आरोपी सुटता कामा नये. सीआयडी आणि पोलीस यांनी चौकशी करायची आहे. यांच्यामुळे संतोष देशमुख यांची हत्या झाली आहे. त्यांच्यावर
हत्येचा गुन्हा दाखल केला पाहिजे. मुख्यमंत्र्यांच्या शब्दाला काही किंमत आहे की नाही? ज्याने खून घडवले, खंडणी गोळा केली, याला कोणत्या खासदाराचे, आमदाराचे पाठबळ आहे, हे पाहण्याचे काम मुख्यमंत्र्यांचे नाही का? हुकूमशाही आहे का? आम्हा सर्वांना मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे. ते कोणालाही सोडणार नाहीत.
संभाजीराजे छत्रपती यांनी प्रतिक्रिया दिली की, धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर, लगेच दुसऱ्या दिवशी कराड शरण येतो. यामागे काहीतरी गुपित आहे. अथवा हा संशोधनाचा भाग आहे. शरण आल्याने गुन्हा संपत नाही. 14 गुन्हे दाखल असताना हा माणूस सुरक्षारक्षक घेऊन फिरतो. खंडणीच्या गुन्ह्याची चौकशी झाल्यानंतर जामिनावर बाहेर पडेल, हा खेळखंडोबा आम्ही सहन करणार नाही. मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी मोक्का कसा लावणार आणि हत्येचा गुन्हा कसा दाखल करणार, याबद्दल स्पष्टीकरण द्यायला हवे.
वाल्मिक कराड शरणागतीनंतर संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख म्हणाली की, आम्हाला न्याय मिळायला हवा, एवढीच आमची मागणी आहे. आरोपी जर स्वतःहून पोलिसांना शरण येत असेल तर पोलीस यंत्रणा काय करते? हा प्रश्न निर्माण होतो.जर पोलीस आरोपींना पकडू शकत नसतील तर आम्ही न्यायाची अपेक्षा कोणाकडे करायची?. आम्हाला न्याय कधी मिळणार? माझी एकच मागणी आहे की, सीडीआरनुसार जे आरोपी आढळतील त्या सर्वांना अटक करून लवकरात लवकर आम्हाला न्याय द्या. वाल्मिक कराड चौकशीअंती दोषी आढळल्यास त्यांनादेखील शिक्षा द्या.
शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे म्हणाले की, वाल्मिक कराड यांचा संबंध नव्हता, तर त्याने पहिल्या दिवशी आत्मसमर्पण का नाही केले? बाहेर का पळाले? आत्मसमर्पणासाठी 22 दिवस का लागले? त्यांना कोणत्या गुन्ह्यात अटक झाली आहे? तपासात हत्या प्रकरणाशी संबंध असल्याचे सिद्ध झाले तर त्यांना अटक झाली पाहिजे. पारदर्शकपणे तपास करणे, हे सीआयडीचे काम आहे.
शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले की, उत्तर प्रदेश, बिहारमध्येही अशाप्रकारे आरोपी कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे काढत नसेल. आरोपी आधी व्हिडिओ प्रसिद्ध करतो. स्वतःला निर्दोष ठरवतो आणि मग पांढऱ्या शुभ्र एसयूव्हीमधून स्टाईलमध्ये पोलीस कार्यालयात एन्ट्री मारतो. याला काय म्हणावे? वाल्मिक कराड सर्व काही सेट केल्यानंतर पोलिसांना शरण आला आहे. तो शरण जाणार हे मी आधीच सांगितले होते. सर्व सेट करण्यासाठीच इतके दिवस लागले. वाल्मिक कराड खंडणीविषयी बोलत आहे. हत्येबद्दल बोलत नाही. या केसमधील अधिकाऱ्यांनीच त्याला मदत केली आहे. त्यामुळे त्याच्यावर 302 चा गुन्हा अजिबात दाखल होणार नाही. कारण याचा बाप केबिनमध्ये बसला आहे. राज्याच्या राजकारणात आतापर्यंत एवढे मोठे आरोप कोणत्याही मंत्र्यावर झाले नाहीत. ज्या केज पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल आहे, तिथे महाजन नावाचे इन्स्पेक्टर आहेत. तेच महाजन हे आंधळे खून प्रकरणात तपास अधिकारी आहेत. ज्या केसमध्ये बबन गीते नव्हताच, त्या केसमध्ये त्याला आरोपी ठरवले आणि वाल्मिक कराडला मोकळे सोडले.
वाल्मिक कराड शरणागती नंतर संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख म्हणाली की, आम्हाला न्याय मिळायला हवा, एवढीच आमची मागणी आहे. आरोपी जर स्वतःहून पोलिसांना शरण येत असेल तर पोलीस यंत्रणा काय करते, हा प्रश्न निर्माण होतो. पोलीस आरोपींना पकडू शकत नसतील, तर आम्ही न्यायाची अपेक्षा कोणाकडे करायची? आम्हाला न्याय कधी मिळणार? माझी एकच मागणी आहे की, सीडीआरनुसार जे आरोपी आढळतील त्या सर्वांना अटक करून लवकरात लवकर न्याय द्या. वाल्मिक कराड चौकशीअंती दोषी आढळल्यास त्यालादेखील शिक्षा द्या.
मस्साजोगच्या नागरिकांचे
आज जलसमाधी आंदोलन

संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांवर कडक कारवाई व्हावी. ज्या आरोपींना अजून अटक झाली नाही, त्यांना लवकरात लवकर अटक करावी या मागणीसाठी मस्साजोग ग्रामस्थ उद्या सामूहिक जल समाधी आंदोलन करणार आहेत. पुण्यातील सीआयडी कार्यालयात वाल्मिक कराड स्वतः हजर झाला. त्यामुळे या प्रकरणातील मोठी मागणी पूर्ण झाली. तरीही इतर तीन आरोपी अजून मोकाट आहेत. त्यांना अटक करण्याची मागणी आता लावून धरण्यात आली आहे. मस्साजोग ग्रामस्थांनी केज तहसीलदारांना या आंदोलनाविषयीचे निवेदन दिले आहे.
मला या राजकारणात जायचे नाही! फडणवीसांची स्पष्ट भूमिका
वाल्मिकच्या शरणागतीवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पहिल्या दिवशीपासून बीड प्रकरणात आम्ही कोणालाही सोडणार नाही, अशी आमची स्पष्ट भूमिका आहे. या प्रकरणात ज्यांचा संबंध आढळेल, त्यांच्यावर कडक कारवाई होईल. राज्यात गुंडांचे राज्य आम्ही चालू देणार नाही. अशा प्रकारे हिंसा करता येणार नाही, खंडणी मागता येणार नाही. या प्रकरणात तपासाला वेग दिला आहे. त्यामुळे आज त्याला शरणागती पत्करावी लागली. हत्येतील कोणत्याही आरोपीला सोडणार नाही. जे आरोपी फरार आहेत, त्यांना पकडण्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लागल्या आहेत.
ते पुढे म्हणाले की, स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या भावाशी माझी फोनवर चर्चा झाली. यावेळी त्यांना विश्वास दिला की, काळजी करू नका. जोपर्यंत दोषी फासावर लटकत नाही, तोपर्यंत सर्व प्रकारची कारवाई केली जाईल. वाल्मिक कराडवर कोणता गुन्हा दाखल होईल, हे पोलीस सांगतील. ते त्यांचे काम आहे. आम्ही जाणीवपूर्वक ही केस सीआयडीला दिली आहे. या प्रकरणाच्या चौकशीत कोणताच दबाव नसेल, नियमानुसार चौकशी होणार आहे. पुराव्यांच्या आधारावर दोषींवर कारवाई केली जाईल. माझ्यासाठी संतोष देशमुख यांच्या गुन्हेगारांना शिक्षा होणे महत्त्वाचे आहे, या प्रकरणातील राजकारणात मला जायचे नाही. कोण काय म्हणाले, व्हिडिओ काय आहेत हा विषय नाही. जिथे पुरावा तिथे कारवाई होईल. काही लोकांना केवळ राजकारण महत्त्वाचे आहे, त्यांचे राजकारण त्यांना लखलाभ असो. त्यांच्या राजकारणाचा काही फायदा होणार नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top