वेळापत्रकाचे नियोजन
शाळास्तरावरच असावे
पुणे- राज्यभरातील शाळांमधील पहिली ते नववी वर्गाची वार्षिक परीक्षा एकाचवेळी घेण्याचा निर्णय शिक्षण उपसंचालक रजनी गावडे यांनी जाहीर केला आहे. मात्र या निर्णयाला शिक्षकांसह शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांनी कडाडून विरोध केला आहे. सर्व शाळांची वार्षिक परीक्षा ८ ते २५ एप्रिल या कालावधीत परीक्षा घेण्याचे वेळापत्रक कोणत्याच दृष्टीने सुसंगत नसून हा आदेश रद्द करून पूर्वीप्रमाणे शाळा स्तरावर परीक्षांचे वेळापत्रक ठरविण्याचे नियोजन करावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने केली आहे.
महाराष्ट्रात मार्चच्या सुरुवातीलाच उन्हाच्या झळा सुरू झाल्या आहेत. एप्रिलच्या मध्यावर विदर्भ, मराठवाडा या भागात दुपारच्या वेळी बाहेर पडणेही अशक्य होते. या काळात परीक्षा ठेवणे हे विद्यार्थ्यांच्या प्रकृतीशी खेळण्यासारखे आहे, अशी भावनाही या निमित्ताने शिक्षकांनी व्यक्त केली. नवीन निर्णयाप्रमाणे २५ एप्रिल रोजी शेवटचा पेपर होणार आहे. त्यानंतर उत्तरपत्रिका तपासणे, संकलित निकाल तयार करणे, प्रगतीपुस्तक लिहिणे, संचयी नोंदपत्रक लिहिणे, ही कामे निपटणे अशक्य आहे. त्यामुळे प्रसिद्ध करण्यात आलेल्या वेळापत्रकात बदल करून प्रचलित पद्धतीनुसार परीक्षांचे वेळापत्रक बनविण्याचे काम शाळांकडेच सोपवावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने केली आहे.