माळशिरस – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील पुरंदवडे येथील पहिल्या गोल रिंगणात अश्व अंगावर पडल्याने एका मुक्त छायाचित्रकाराचा मृत्यू झाला.कल्याण चट्टोपाध्याय असे मृत्यू झालेल्या छायाचित्रकाराचे नाव असून ते पश्चिम बंगालचे रहिवाशी होते.
याप्रकरणी अकलूज पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली आहे. छायाचित्रकार चटोपाध्याय हे पश्चिम बंगालमधून वारीची छायाचित्र टिपण्यासाठी गुरुवारी आले होते.रिंगण सुरू असताना रिंगण आखलेल्या ठिकाणी ते कडेला बसले होते.रिंगण सुरू असताना माऊलींच्या अश्वाच्या लगामीत स्वाराच्या अश्वाचा पाय अडकला आणि स्वाराचा अश्व तोल जाऊन रिंगणाच्या कडेला बसलेल्या भाविकांच्या गर्दीत पडला. चटोपाध्याय अश्वाच्या शरीराखाली आले. यात गंभीर जखमी झालेल्या चटोपाध्याय यांच्या तोंडातून रक्त वाहत होते. घटनास्थळी उपस्थित पोलिस आणि एनएसएसच्या स्वयंसेवकांनी त्यांना अकलूज येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.