कोल्हापूर-पन्हाळा तालुक्यातील वारणानगर येथील विनय कोरे यांच्या श्री वारणा विभाग शिक्षण मंडळास ‘वारणा विद्यापीठ’ म्हणून राज्य शासनाकडून मंजुरी देऊन विनय कोरे यांना खूष करण्यात आले . मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षेतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत वारणा विद्यापीठ म्हणून मंजुरी देण्यात आली. याबाबतची माहिती कळताच वारणा परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला आहे.
वारणा समूहाचे संस्थापक सहकारमहर्षी स्व. तात्यासाहेब कोरे यांनी १९५० साली वारणेच्या फोंडया माळावर साखर कारखान्याबरोबरच शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. परिसरातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या सुविधा सुरू करून शिक्षणाचे केंद्र बनवले. वारणा शिक्षण मंडळात केजीपासून प्राथमिक,माध्यमिक आणि उच्च शिक्षणांपर्यंतच्या सर्व शैक्षणिक सुविधा सुरू केल्या आहेत. वारणा संकुल वारणा विद्यापीठ व्हावे यासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. उच्च व तंत्रशिक्षण खात्याच्या नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत वारणा विद्यापीठ समूह विद्यापीठ म्हणून शिक्कामोर्तब करण्यात आले असल्याचे वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.व्ही.व्ही.कार्जी यांनी दिली.